मुंबई: सकाळी साधारणतः १३.३० ची वेळ…. विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने बाहेरील सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक…… अशात गेटवर महिला पोलिसांची पळापळ…..वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांची मोठी संख्या…… गेटवर अधिवेशनकरीता आलेले कर्मचारी – अधिकारी बाहेर ताटकळत उभे…. दोन गोंडस मुलांच्या आर्त किंकाळ्या, रडारड….. माझ्या आईला का मारता…. तिला का पकडता….. सोडा माझ्या आईला….. तिला जाऊ दया….. अशी त्या दोन चिमुरड्यांची रडत रडत पोलिसांना विनवण्या….. आता नेमकं काय होतंय याची त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचलेली…… त्यात पत्रकार असल्याने आत सहज प्रवेश करून अधिक माहिती घेतली असता परिस्थितीचा नेमका उलगडा झाला, पण तोही अर्धवट….. अशात समोर पाहिले असता महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या गराड्यात एक उच्च घराण्यातली सुसंस्कृत महिला….. रडत रडत त्या अधिकाऱ्यांना आर्त विनंती करत होती…. बहुधा जास्त रडल्यामुळे त्या महिलेचे डोळे सुजलेले……” अहो मला फक्तं एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन मिनिटं भेटू द्या….. मी त्यांची वर्षभरापासून भेट मागतेय, पण ते भेटतच नाहीत…. ते त्या व्यक्तीला का वाचवत आहेत….. कशासाठी सेफ करत आहेत काहीच कळत नाही. असाही आमच्यावर जो अन्याय होतोय….. त्याचा आम्हाला न्याय मिळावा…. ही त्या महिलेची रडत रडत आर्त विनंती…पण त्या महिला पोलिस अधिकारी काहीही ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हत्या…..
त्यातील एक थ्री स्टार अधिकाऱ्याचा हाताखालच्या महिला पोलिसांना सतत आदेश….. अरे तिला पकडा….. गाडीत बसवा… ती महिलाही जिद्दीला पेटलेली…… ती कोणाचे जुमानत नव्हती….. काहीही ऐकण्याच्या परिस्थितीत ती त्यावेळी तरी नव्हतीच…… त्या दोन गोंडस मुलांचे सोबतीला रडणे सुरूच….. पण त्या महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या मायेला पाझर काही फुटत नव्हता….. अर्धा ते पाऊण तास हा हाय प्रोफाईल ड्रामा गेट वर सुरू होता…..
पण कळत नव्हतं ती सुसंस्कृत, श्रीमंत घराण्यातील दिसणारी ती महिला कोण असावी….. तो एक लहान मुलगा व एक मुलगी अतिशय गोंडस, अशी का आली असावी ती महिला आपल्या लहान पिल्लांना घेऊन विधानभवनात…… असे तिचे काय काम होते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे…….. असे प्रश्न मनाला पडत होते….. दया येत होती त्या दोन चिमुकल्यांची…….. आपल्या आईला पोलिसी जाचातून सोडवण्याची त्यांची रडत रडत विनंती… मन भेदून जाणारे ते विदारक दृश्य……!
मात्र माझ्या आतला पत्रकार अस्वस्थ…. मग सुरू झाले त्या महिलेची अधिक माहिती घेण्याची तयारी….. मगं हाती जी माहिती आली ती तरं मनाला चीड आणणारी व माणुसकीला काळीमा फासणारी अशीच होती…. ती महिला व तिची ती दोन गोंडस मुले होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विदर्भातील एक कट्टर समर्थक, माजी राज्यमंत्री व विधान परिषदेचे सदस्य असलेले भाजपचे परिणय यांच्या सख्ख्या मोठ्या भावाची बायको….. व आमदारांची भावजय प्रिया फूके……
प्रियाने यापूर्वीच मीडियाला जाहिरपणे दिलेल्या माहितीनुसार, किडन्या खराब झाल्याने दोन वर्षापूर्वी आमदार परिणय यांचे सख्खे मोठे भाऊ संकेत फुके यांचे निधन झालेले. त्यानंतर मग तिच्या सासरच्या मंडळींनी (आमदार परिणय यांचे आई वडील आणि बहीण) तिचा तब्बल दोन वर्ष अतोनात छळ करून प्रियाला त्यांनी घराबाहेर काढलेले….. व त्या दोन मुलांचा ताबा द्यावा म्हणून आमदार परिणय फुके तिच्या आई वडील व नातेवाईकांकडे माणसे पाठवून सतत धमक्या देऊ लागले…. आता खुद्द दीर आमदार असल्याने व त्यात मुख्यमंत्री फडणवीस यांचा खास असल्याने स्थानिक पोलीस तिची दखल घेईना…… अशात गेले दोन वर्ष ती मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्याचा आटोकाट प्रयत्न करतेय, पण त्यातही मुख्यमंत्री काही दाद लागू देत नव्हते ……… मगं अखेर तिने हा मार्ग चोखाळला होता…..
आता प्रियाने जे आरोप केले तेही गंभीर असेच आहेत….प्रिया फुके यांनी यापूर्वी देखील आमदार परिणय फुके आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर त्यांनी माध्यमांसमोर येत सांगितले होते की, “माझं आणि संकेत फुके यांचं लग्न २०१२ साली फसवणूक करून लावण्यात आलं. लग्नाच्या दोन वर्षांपूर्वीच त्यांचं किडनी प्रत्यारोपण झालं होतं, हे सत्य माझ्यापासून लपवलं गेलं.” मात्र हा प्रकार उघड होताच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
संकेत फुके यांचे २०२२ मध्ये निधन झाल्यानंतर प्रिया फुके यांचे हाल अधिकच वाढले. कुटुंबातून बेदखल, मानसिक व शारीरिक त्रास, मुलाच्या कस्टडीसाठी दबाव, तसेच अत्याचारासाठी लोकांना पाठवण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला….. त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण होतो की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात महिलांच्या प्रश्नांवर ज्या हिरीरीने बोलतात ते सर्व खरे की फक्तं देखावा….. तर दुसरीकडे कुठेही एखाद्या मुलीवर अत्याचार झाला तर त्यावर तावातावाने भूमिका मांडणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महिला आमदार उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनाही हा प्रकार कळलाच असावा….. किमान त्यांनी तरी याची दखल घेणं आवश्यक होते….. मगं याप्रकरणी सर्व पक्षातल्या महिला आमदारांनी याची कोणतीच दखल न घेणे म्हणजे कुठेतरी फडणवीस यांच्या समोर सर्वांनीच शरणागती पत्करण्यासारखेच आहे नव्हे काय……..!