कैलास गोरंट्यालही ३१ जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार, पण वरपुडकरांसोबत नाही
मुंबई : मराठवाड्यात काँग्रेसचे आधारस्तंभ असलेल्या दोन नेत्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. परभणीचे माजी मंत्री व काँग्रेस नेते सुरेश वरपुडकर यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात अधिकृत प्रवेश केला.
मात्र या कार्यक्रमात जालना जिल्ह्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हजर राहिले नाहीत, आणि त्यांच्या अनुपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. याबाबत स्पष्टीकरण देताना गोरंट्याल यांनी “मी सुरेश वरपुडकरांसोबत प्रवेश नको, हे भाजप नेत्यांना पूर्वीच कळवले होते. त्यामुळे माझा स्वतंत्र प्रवेशसोहळा ३१ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे,” असे स्पष्ट केले.
कैलास गोरंट्याल यांनी सांगितले की, ३१ जुलै रोजी जालन्यात भाजप प्रदेश कार्यालयात आपला पक्षप्रवेश होणार असून, काँग्रेसमधील अनेक माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यही त्यांच्यासोबत भाजपात प्रवेश करणार आहेत.
“महापालिका निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर स्वबळावर संपूर्ण ताकदीने लढणार,” असे ठाम विधान त्यांनी यावेळी केलं.
गोरंट्याल यांचा काँग्रेसमधील प्रवास
• काँग्रेसमधील ३५ वर्षांचा कार्यकाळ
• १९९९, २००९ व २०१९ साली जालना विधानसभा मतदारसंघातून तीनदा आमदार
• पत्नी संगीता गोरंट्याल यांची नगराध्यक्षपदाची यशस्वी कारकीर्द
• जालन्यातील नगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून गोरंट्याल यांचा प्रभाव
”पन्नास खोके एकदम ओक्के” – ती ऐतिहासिक घोषणा
गोरंट्याल हे २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारविरोधातील विधानभवनाच्या पायऱ्यांवरील आंदोलनात “पन्नास खोके एकदम ओक्के” ही घोषणा देणारे पहिले नेते होते. ही घोषणा संपूर्ण राज्यात आणि देशात गाजली, आणि त्यांचं नाव प्रसिद्धीच्या झोतात आलं.
सुरेश वरपुडकर आणि कैलास गोरंट्याल हे दोघेही काँग्रेसमध्ये आपापल्या जिल्ह्यांत एकहाती सत्ता राखणारे नेते म्हणून ओळखले जात. त्यांचा भाजपकडून समांतर पक्षप्रवेश हे काँग्रेससाठी मराठवाड्यातील मोठं नुकसान ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, गोरंट्याल यांनी वरपुडकर यांच्याशी असलेल्या राजकीय मतभेदांवर शिक्कामोर्तब करत, स्वतःचा स्वतंत्र प्रभाव दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे परभणी व जालना जिल्ह्यांत भाजपची नव्या ताकदीनं मुसंडी सुरू झाली आहे.
या दोघांचा भाजप प्रवेश म्हणजे मराठवाड्यात पक्षासाठी ‘राजकीय डबल बोनस’ ठरणार असून, येत्या महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपचा प्रभाव अधिक व्यापक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.