महाड: कोकणातील मनसेचा किल्ला म्हणून ओळखले जाणारे खेड आणि तेथील माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांची हकालपट्टी केल्यानंतर, दोनदा नियोजित असलेला भाजप प्रवेश रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, कोजागिरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर त्यांनी भाजप नेते नारायण राणे, नितेश राणे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या छायाचित्रांसह दिलेल्या शुभेच्छा संदेशामुळे — खेडेकर हे अखेर भाजपातच प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा रत्नागिरी जिल्ह्यात रंगू लागली आहे.
वैभव खेडेकर यांचा पहिला भाजप प्रवेश ४ सप्टेंबर रोजी मुंबईत निश्चित करण्यात आला होता. खेडहून मोठा ताफा घेऊन समर्थक मुंबईत दाखल झाले होते, मात्र भाजप कार्यालयात एकही प्रमुख पदाधिकारी उपस्थित नसल्याने प्रवेश पुढे ढकलण्यात आला.
यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर नव्या तारखेची घोषणा करण्यात आली, पण तोही कार्यक्रम रद्द झाला. या घडामोडींमुळे खेडेकर समर्थकांत नाराजीचे वातावरण पसरले होते.
या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिंदे सेनेचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, “वैभव खेडेकर यांच्यासारख्या नेत्याचा पक्षप्रवेश रद्द होणे म्हणजे त्यांचे खच्चीकरण होय. असे प्रकार आमच्याकडे (शिंदे गटात) होणार नाहीत. त्यांना शिवसेनेची दारे सदैव खुली आहेत.”
या विधानामुळे खेडेकर शिंदे गटात जाणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला होता.
मात्र, कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने झळकलेल्या शुभेच्छा बॅनरवर भाजप नेते नारायण राणे, नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्या फोटोंचा समावेश दिसून आल्याने सगळ्या चर्चांना दिशा मिळाली. खेडेकर यांनी दिलेल्या या बॅनरवरील शुभेच्छा संदेशानेच त्यांच्या पुढील राजकीय दिशेचा स्पष्ट संकेत दिला आहे.
आज जाहीर झालेल्या नगर परिषदेच्या आरक्षण सोडतीनुसार खेड नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठरले आहे. मात्र खेडेकर आता भाजपाच्या माध्यमातून निवडणुकीची तयारीला लागले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे खेडमधील आगामी निवडणुकीत भाजपचे वैभव खेडेकर शिंदे गटातील रामदास कदम, योगेश कदम आणि संजय राव कदम यांच्या विरोधात थेट मैदानात उतरतील, असे संकेत मिळत आहेत.
खेडेकर यांचा संभाव्य भाजप प्रवेश हा रत्नागिरी जिल्ह्यातील शिंदे गट आणि भाजप यांच्यातील अंतर्गत संघर्ष अधिक चिघळवणारा ठरू शकतो. नारायण राणे यांच्या आशीर्वादावर खेडेकर पुन्हा राजकीय पुनरागमन करणार असल्याची चर्चा आता जोर धरत आहे.
मनसेतून हकालपट्टी → भाजप प्रवेश दोनदा रद्द → उदय सामंतांचे आमंत्रण → कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छांमधून भाजप नेत्यांसोबतचे स्नेह प्रदर्शन → आणि आता खेड निवडणुकीसाठी रणतयारी!