मुंबई: त्रिभाषा धोरणाविरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा गट) मोर्चा काढत असतानाच भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी या आंदोलनावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी हे आंदोलन ढोंगी असून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे.
ट्विट करताना बन म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, फेब्रुवारी २०२२ मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (NEP) टास्क फोर्सचा अहवाल अधिकृतपणे स्वीकारला गेला होता. त्या अहवालात स्पष्ट नमूद आहे की इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण लागू करावे आणि तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवावी.”

“मग आता उबाठा गट नेमकं त्या धोरणाविरोधात का मोर्चा काढतोय? स्वतः घेतलेल्या निर्णयावर रडगाणं गाणं म्हणजे ढोंग नाही का?” असा सवाल करत बन यांनी आंदोलनाची खिल्ली उडवली.
“हे आंदोलन नाही, तर फक्त जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे. सत्तेत असताना धोरण मंजूर करायचं, आणि बाहेर पडल्यानंतर ‘हिंदी सक्ती’चा मुद्दा उकरून काढायचा – ही उबाठांची स्टाईल आहे,” असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना बन यांनी विचारले, “उद्धवजी अजून किती युटर्न घेणार?”
राज्यातील भाषावादावरून राजकीय वातावरण तापले असताना, नवनाथ बन यांच्या या ट्विटने नव्या वादाला तोंड फोडले आहे. भाजपने यानिमित्ताने उबाठा गटाच्या भूमिकेतील विरोधाभास अधोरेखित करत, त्यांची विश्वासार्हताच प्रश्नात आणली आहे.
राज्यातील मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना, ‘हिंदी सक्ती’चा मुद्दा नव्याने राजकीय संघर्षाचे केंद्रबिंदू बनण्याची चिन्हे आहेत.