भाजपानेच पूर्वी ठराव, नामकरणे आणि गौरव केले होते, असा दावा
मुंबई: टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध करणाऱ्या भारतीय जनता पक्षचा दुटप्पीपणा आणि ध्रुवीकरणाचा अजेंडा उघड झाल्याचा दावा काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे. भाजपानेच पूर्वी विविध ठिकाणी टिपू सुलतान यांच्या नावाचे ठराव मांडले, रस्त्यांना नावे दिली आणि नेत्यांनी गौरवोद्गार काढले होते, असे उदाहरणांसह सावंत यांनी म्हटले आहे.
सचिन सावंत यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये भाजपाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना अनेक घटनांची नोंद केली आहे.
भाजपाच्याच काळातील ठराव व निर्णयांचा उल्लेख
सावंत यांच्या दाव्यानुसार, २०१२ मध्ये अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला “शहीद वतन शेरे म्हैसूर टिपू सुलतान” असे नाव देण्याचा ठराव भाजपानेच मांडला होता. त्या वेळी सूचक म्हणून माजी महापौर आणि भाजपाचे नेते विजय अग्रवाल यांचे नाव होते.
तसेच, २०१३ मध्ये मुंबईच्या एम/पूर्व वॉर्डातील एका रस्त्याला “शहीद टिपू सुलतान मार्ग” असे नाव देण्याचा प्रस्ताव आला होता. या प्रस्तावावेळी भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते, असा दावा सावंत यांनी केला आहे.
याशिवाय, २००१ मध्ये अंधेरी (पश्चिम) येथे “शेरे म्हैसूर टिपू सुलतान मार्ग” नामकरणाचा ठराव भाजपाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत आणि भाजप नगरसेवकांच्या सहमतीने एकमताने मंजूर झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
भाजप नेत्यांचे गौरवोद्गारही दाखवले
सचिन सावंत यांच्या मते, भाजपाचे ज्येष्ठ नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनीही टिपू सुलतान यांच्या कबरीवर भेट देऊन अभ्यागत वहीत गौरवोद्गार नोंदवले होते.
तसेच, २०१७ मध्ये कर्नाटक विधानसभेत तत्कालीन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी टिपू सुलतान यांच्याविषयी सकारात्मक वक्तव्य केले होते, असेही सावंत यांनी आठवण करून दिली.
‘ध्रुवीकरणासाठी भूमिका बदलली’ असा आरोप
या सर्व उदाहरणांच्या आधारे सचिन सावंत यांनी असा दावा केला आहे की, भाजपाने पूर्वी टिपू सुलतान यांच्या नावाला मान्यता दिली होती, मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत ध्रुवीकरणाच्या अजेंड्यासाठी भूमिकेत बदल करण्यात आला आहे.
इतिहास बदललेला नाही, पण राजकीय सोयीनुसार त्याची मांडणी बदलली जात असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. टिपू सुलतान यांच्या नावावरून सुरू असलेला वाद हा तत्त्वांचा नसून राजकीय फायद्यासाठी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

