मुंबई – आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने आता मराठी मतदारांवर लक्ष केंद्रित केले असून, निवडणुकीच्या रणशिंगाची चाहूल लागताच पक्षाने आपल्या प्रचाराचा ‘अस्सल मराठी अवतार’ सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.
राज्य सरकारने यंदा गणेशोत्सवाला दिलेला ‘राज्य महोत्सव’ दर्जा भाजपसाठी महत्त्वाचे राजकीय हत्यार ठरणार आहे. याच्या निमित्ताने मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपर्यंत थेट पोहोचण्याचा पक्षाचा डाव आहे. विविध सांस्कृतिक उपक्रम, स्पर्धा आणि आकर्षक कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी मतदारांची मोट बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
याचाच भाग म्हणून, मुंबई उपनगर पालकमंत्री व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी नुकतेच जाहीर केले की राज्य सरकारकडून शहरातील भजनी मंडळांना २५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार असून हा निधी भजन साहित्य खरेदीसाठी वापरता येतील.
केवळ एवढ्यावरच न थांबता, कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी भाजपने खास ‘मोदी एक्सप्रेस’ या दोन विशेष गाड्या व ५०० पेक्षा अधिक बसेसची व्यवस्था केली आहे. प्रवाशांना मोफत चहा-नाश्ता व भजनाचा आनंद मिळणार असून, या यात्रेतून भाजपचा संदेश प्रत्येक प्रवाशापर्यंत पोहोचवण्याची राजकीय रणनीती आखली गेली आहे.
अगदी दोन दिवसांपूर्वीच, बेस्टच्या सहकारी पतपेढीत – जी अनेक वर्षे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात होती – भाजपने निर्विवाद बहुमत मिळवत ताबा मिळवला. तेही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवत असताना. या विजयामुळे भाजपचे मनोबल आणखी उंचावले असून आता मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी पक्षाने घेतलेली आक्रमक झेप शिवसेना (उद्धव) व ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरणार आहे.
आतापर्यंत गणेशोत्सव हा शिवसेनेच्या राजकीय ओळखीचा अविभाज्य भाग मानला जात होता. मात्र भाजपने हाच उत्सव आपल्याकडे खेचत मराठी मनांवर थेट डोळा ठेवला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वी गणेशोत्सवाचा हा राजकीय रंग नेमका कुणाच्या बाजूने फळतो, हे पाहणे खरोखरीच उत्सुकतेचे ठरेल.