X : @therajkaran
मुंबई
मुंबई तुंबू नये म्हणून 2005 साली मुंबई मनपाने (BMC) कोट्यावधी रूपये खर्चून सुरू केलेल्या महत्वपूर्ण ब्रिमस्टोवाड प्रकल्पाच्या (Brimstowad Project) कामाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतला पाहिजे. आपण याबाबत लवकरच मुंबई मनपा आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन ब्रिमस्टोवेड प्रकल्पाचा आढावा घेणार आहोत. तसेच मिठीनदीसह मुंबईतील सर्व नाले सफाईची कामे येत्या 31 मे पर्यंत पूर्ण करावीत, अशी सूचना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी संबंधित मनपा अधिकाऱ्यांना केली.
रामदास आठवले यांनी आज बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील मिठी नदी (Mithi river) सफाई कामाची पाहणी केली. यावेळी रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष साधू कटके, मनपाचे कार्यकारी अभियंता विठ्ठल जाधव आदी उपस्थित होते. मिठी नदी सफाईचे कॉन्ट्रॅक्ट 42 कोटी रुपयांचे देण्यात आले आहे. मिठी नदीचे पात्र 180 मीटर रुंद आहे. मिठी नदीतून गाळ कचरा उपसण्याचे काम वेगाने सुरू आहे. मिठी नदी सफाई काम 90 टक्के पूर्ण झाले असून येत्या 31 मे पर्यंत मिठी नदीचे सफाई काम पूर्ण होईल, अशी माहिती संबंधित ठेकेदाराने यावेळी दिली.
26 जुलै 2005 रोजी मुंबईत महापूर (flood in Mumbai) आला होता. त्यात मुंबईत मोठी मनुष्यहानी झाली होती. मुंबईत जलप्रलय येण्यास येथील मिठी नदी आणि तुंबलेले नाले आणि प्लास्टिक कचरा ही कारणे पुढे आली. या संकटातून मुंबई मनपाने धडा शिकून भविष्यात मुंबईत जलप्रलय होऊ नये, मुंबई तूंबु नये म्हणून महत्वाकांक्षी ब्रिमस्टोवेड प्रकल्प मुंबईत सुरू करण्यात आला. या प्रकल्पाचे काम किती पूर्ण झाले, याबाबतची सर्व माहिती घेण्यासाठी आपण लवकरच मनपा आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले.