मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने मतदार यादी शुद्ध करण्याची आणि बांग्लादेशी घुसखोरांची नावे वगळण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आज दिल्लीत केली.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिल्लीतील मुख्य निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार, तसेच आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
ठळक मागण्या: मतदार यादी थेट आधार क्रमांकासोबत जोडा, बांग्लादेशी घुसखोरांची नावे यादीतून वगळा, मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करा
उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, “मुंबईसारख्या महानगरांमध्ये बांग्लादेशी घुसखोरांची नावे मतदार यादीत आढळणे ही लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे. निवडणूक आयोगाने या संदर्भात त्वरीत छाननी करून आवश्यक ती कारवाई करावी.”
या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेलाही शिवसेनेने पुनः एकदा ठाम पाठिंबा दर्शवला. “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच खरी देशहिताची बाजू मांडणारी पार्टी आहे,” असे म्हणत सामंत यांनी आयोगाला पक्षाचा अधिकृत अभिप्राय सादर केला.
या भेटीनंतर काही माध्यमांत धनुष्यबाण चिन्हावरील न्यायालयीन खटल्यावर चर्चा झाली असल्याच्या बातम्या झळकल्या. मात्र उदय सामंत यांनी यावर स्पष्ट भाषेत प्रतिक्रिया देत ती अफवा फेटाळून लावली. “आम्ही न्यायप्रक्रियेवर आणि निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर पूर्ण विश्वास ठेवतो,” असे ते म्हणाले.
शिष्टमंडळात उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, खासदार मिलिंद देवरा आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांचा समावेश होता.
या बैठकीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात हलचालींना गती मिळाल्याचे दिसून येत असून, आगामी स्थानिक निवडणुकांपूर्वी मतदार यादींच्या शुद्धतेसाठी नव्या घडामोडी सुरू होण्याची चिन्हे आहेत.