महाराष्ट्र ताज्या बातम्या

Budget Session: अजित पवार यांच्या मृत्यूबाबत शंका असल्यास डीजीसीएला पत्र द्या; चौकशीतून सत्य बाहेर येईल : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे राज्यभर शोकाकुल वातावरण आहे. या घटनेबाबत कोणाच्याही मनात शंका असल्यास त्यांनी चौकशी करणाऱ्या डीजीसीए (DGCA) कडे थेट पत्र पाठवावे. या चौकशीतून सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. त्यांनी सांगितले की, डीजीसीएची चौकशी सुरू असून राज्य सरकारने सीबीआय चौकशीसही मान्यता दिली आहे. संबंधित कंपनीच्या सर्व विमान उड्डाणांचे सखोल ऑडिट सुरू आहे. केंद्र सरकार किंवा नागरी उड्डाण मंत्रालयाकडे लपवण्यासारखे काहीही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अनेक राज्यांचे नेते या विमानसेवेचा वापर करतात. आपण स्वतःही या विमानातून प्रवास केला आहे. त्यामुळे चौकशीतून सर्व तथ्ये समोर येणे योग्यच आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयावर एसीबीने केलेल्या धाडीचे समर्थन केले. गैरप्रकारांची माहिती अगदी मुख्यमंत्री दालनात घडली असल्याचे जरी समोर आले, तरी चौकशी झालीच पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. या चौकशीत कोठेही मंत्र्यांचे नाव समोर आलेले नाही, तसेच या कारवाईमुळे राज्य सरकारच्या प्रतिमेला कोणताही धक्का बसलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अल्पसंख्याक शाळा दर्जा प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार चौकशी करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या जागतिक एआय समिटमध्ये अनेक देशांचे सर्वोच्च नेते सहभागी झाले होते. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केलेली कृती म्हणजे देशाच्या हिताच्या विरोधात केलेली कृती असल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. काँग्रेस पक्षातील मानवी बुद्धिमत्ता हरपली असून त्यांना आता कृत्रिम बुद्धिमत्तेची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सरकारची भूमिका स्पष्ट करताना, “हे सरकार स्थगितीचे नव्हे, तर प्रगतीचे सरकार आहे,” असा दावा केला. विरोधी पक्षांनी चहापानावर बहिष्कार टाकला असला, तरी त्यांच्या एका सहयोगी पक्षानेच त्यांच्या पत्रकार परिषदेलाही बहिष्कार घातल्याचा टोला त्यांनी लगावला. जनतेने विकास स्वीकारला असून विरोधकांना नाकारले आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असेही शिंदे म्हणाले.

या पत्रकार परिषदेची सुरुवात उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी केली. त्या म्हणाल्या की, अर्थमंत्री म्हणून अजित पवार बारावा अर्थसंकल्प सादर करणार होते आणि अंतिम टप्प्यापर्यंत त्यांनी त्याची तयारी केली होती. राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर पातळीवर नेण्याचे त्यांचे स्वप्न होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते स्वप्न पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात