मुंबई: राज्यातील बुरुड समाजातील बांबू कलाकार आणि कारागिरांना कच्चा माल उपलब्ध करण्यात अडथळे निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच या समाजातील युवकांना बांबू उत्पादनातून कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रिमंडळाची विशेष समिती नियुक्त करून धोरण तयार केले जाईल, असे स्पष्ट उत्तर वनमंत्री Ganesh Naik यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला दिले.
ही लक्षवेधी सूचना सदस्य Rajkumar Badole यांनी मांडली होती. ज्येष्ठ काँग्रेस नेते Nana Patole यांनी बुरुड समाज पारंपरिकरित्या बांबू कारागिरी व्यवसायात कार्यरत असल्याचे सांगत, त्यांच्या उपजीविकेसाठी आवश्यक बांबू सहज उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली. तसेच या व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी बुरुड समाजातील युवकांचीच निवड करण्याची मागणी त्यांनी केली.
सदस्य Kishor Zodgewar यांनी ग्रामीण भागात “बांबू ही सोन्याची कांडी” अशी म्हण प्रचलित असल्याचे सांगत, बुरुड समाजाचा पारंपरिक व्यवसाय टिकून राहण्यासाठी लाल व हिरवा बांबू उपलब्ध करून द्यावा आणि बांबू लागवडीसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली.
ज्येष्ठ नेते Vijay Wadettiwar यांनी हा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत तज्ज्ञ समिती नेमण्याचा विचार आहे का, असा सवाल उपस्थित केला. तर Vinay Kore यांनी वनविभागाच्या अखत्यारीतील पडिक जमीन बांबू लागवडीसाठी उपलब्ध करून देण्याचा मुद्दा मांडला.

