मुंबई: राज्यातील महायुती सरकारमधील काही मंत्र्यांचे सततचे वादग्रस्त वर्तन, घोटाळे आणि अपयशी कारभार यामुळे सरकारची प्रतिमा मलीन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात लवकरच मोठ्या प्रमाणावर मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अचानक झालेला दिल्ली दौरा या चर्चा अधिकच गडद करत आहे.
शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन घटक पक्षांतील काही वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिपदावरून हटवले जाण्याची शक्यता आहे.
– यामध्ये सर्वात पुढे नाव आहे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे. विधान परिषदेत ऑनलाईन रमी खेळताना त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
– सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे ओबीसी आरक्षणावरील वादग्रस्त विधान आणि नोटांच्या बॅगेसंदर्भातील व्हायरल क्लिप त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.
– रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या कामगिरीतील ढिसाळपणा,
– शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हिंदी भाषा सक्तीबाबत घातलेला गोंधळ,
– तर राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर त्यांच्या आईच्या मालकीच्या ‘सावली बार’वर पोलिसांच्या धाडीनंतर निर्माण झालेला वाद — हे सगळे प्रकरणे आता मंत्रिपदावर परिणाम करू शकतात.
फडणवीस हे केवळ घटक पक्षातील नव्हे, तर भाजपमधीलही काही मंत्र्यांबाबत नाराज असल्याचे बोलले जात आहे.
– मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची कामगिरी समाधानकारक असली तरी त्यांच्या सततच्या आक्रमक वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्याही मंत्रिपदाबाबत प्रश्नचिन्ह आहे.
– ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची वादग्रस्त पार्श्वभूमी,
– तर गिरीश महाजन यांच्यावर कायमचा “संकटमोचक” ठरल्याचा टॅग — यामुळे त्यांनाही मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळात नव्याने प्रवेश मिळण्याची शक्यता असलेल्या नावांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांचे नाव आहे. त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद देण्यात येण्याची शक्यता असून त्यांच्या जागी सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्षपद दिले जाईल, अशी जोरदार चर्चा आहे.
महायुतीने लोकसभा निवडणुकीत यश मिळवले असले तरी काही मंत्र्यांमुळे सरकारची प्रतिमा डागाळल्याचे आढळून आले. आता येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार प्रतिमा सुधारणे आणि भाजपमध्ये नव्या चेहऱ्यांना स्थान देण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
मंत्रिमंडळ फेरबदल हा केवळ अंतर्गत घडामोडींचा भाग नसून, आगामी राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम करणारा मोठा टप्पा ठरू शकतो. त्यामुळे या खांदेपालटाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.