मुंबई – राज्यातील महसूल यंत्रणेत शिस्त आणण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी कडक पवित्रा घेतला. “ज्या अधिकाऱ्यांनी फेसॲपवर उपस्थिती नोंदवली नाही, त्यांचा पगार थांबवण्यात येईल. ज्या दिवशी हजेरी नसेल, त्या दिवशी गैरहजर मानलं जाईल,” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
या नव्या आदेशानुसार तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी ते जिल्हाधिकारी यांच्यासाठी फेसॲपवर दररोज हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे. ज्या अधिकाऱ्यांची पोस्टिंग ज्या गावात आहे, तिथूनच हजेरी लावावी लागेल, अन्यथा ऑगस्टपासून पगार थांबवण्यात येईल, असा इशारा महसूलमंत्र्यांनी दिला.
बावनकुळे म्हणाले, “महसूल यंत्रणेत शिस्तबद्धता यावी आणि मनमानी गैरहजेरीला आळा बसेल, या हेतूनेच हा निर्णय घेतला आहे.” मात्र, पगार थांबवण्याच्या इशाऱ्यामुळे राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
पावसाळ्यात आंदोलन नको – प्रहारच्या मागण्या मान्य
दरम्यान, प्रहार संघटनेच्या आंदोलनाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, “बच्चू कडूंसोबत चर्चा झाली असून त्यांच्यातील बहुतेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात आंदोलन करू नका, सरकार तुमचं ऐकतंय.” दिव्यांग मानधन वाढ आणि कर्जमाफीसाठी एसओपी तयार करण्याचं काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
फेसॲप सक्तीमुळे महसूल यंत्रणा अधिक शिस्तबद्ध होईल की कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढेल, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.