मुंबई : नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी गोळ्यांच्या बेकायदेशीर विक्रीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ यांनी या प्रकरणी सरकारला काही महत्त्वाचे प्रश्न विचारले.
पुणे खडकपाडा पोलिसांनी समीर हमीद शेख आणि सुनील गजानन शर्मा या दोघांना अटक केली असून, त्यांच्या कोंढवा येथील घरावर टाकलेल्या छाप्यात मनोरुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या सुमारे ६९०० औषधी गोळ्या जप्त करण्यात आल्या.
तपासादरम्यान या गोळ्या कोंढवा, काशेवाडी, हडपसर, कॅम्प आणि येरवडा परिसरात नशेसाठी विकल्या जात असल्याचे समोर आल्याची माहिती देण्यात आली. साधारणपणे अशा औषधांची विक्री डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय करता येत नाही. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात गोळ्यांचा साठा सापडल्यामुळे त्या मेडिकल स्टोअरमधून बाहेर कशा पडतात, हा गंभीर प्रश्न असल्याचे वाघ यांनी नमूद केले.
मेडिकल स्टोअरमध्ये साधारण १ रुपयाला मिळणारी गोळी काळ्या बाजारात ५० ते ६० रुपयांना विकली जाते, असेही त्यांनी सांगितले. प्रिस्क्रिप्शनशिवाय या गोळ्या सहज मिळत नसल्याने अनेक तरुण अनधिकृत विक्रेत्यांकडून त्या विकत घेत असल्याचे त्यांनी म्हटले.
या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारसमोर काही प्रश्न उपस्थित केले. बेकायदेशीरपणे औषधांची विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सवर कारवाई होणार का, फूड अँड ड्रग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार का, तसेच बोगस प्रिस्क्रिप्शन देणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई केली जाणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात उत्तर दिले.

