Twitter :
मुंबई
जी-२० परिषदेच्या निमित्ताने जगाच्या विविध देशांचे प्रमुख शनिवारी राजधानी दिल्लीमध्ये अवतरले, आणि त्यांनी पंतप्रधानांनी मांडलेला ‘दिल्ली जाहीरनामा’ टाळ्या व बाके वाजवून स्वीकारणे हे एक मोठे राजनैतिक यश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्ताने जग जिंकल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी आपल्या ट्विटर वरून केला.
हा एक सुवर्ण दिन होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची किर्ती जगभर पोहोचवली, देशाला महासत्ता बनविण्यासाठी ते अविरत परिश्रम घेत आहेत. त्याचेच एक सकारात्मक चित्र संपूर्ण देशाने पाहिले. अमेरिका, ब्रिटन, जपान, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, युएईसह अनेक बलाढ्य राष्ट्रांचे प्रमुख दिल्लीत आले. एकमताने आणि एक भावनेने एकत्र येऊन अधिक समृद्ध आणि सुसंवादी भविष्यासाठी काम करण्याचे वचनच पंतप्रधानांनी यावेळी दिले, अशा शब्दात त्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदनही केले.
‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना घेऊन भारताने जी-२० परिषदेचे यजमानपद स्वीकारले आणि यशस्वी आयोजनही केले. या राष्ट्रगटाच्या अध्यक्षपदाचा सन्मान पंतप्रधान मोदीजींच्या रूपाने भारताला प्रथमच मिळाला, ही तमाम देशवासियांसाठी अतिशय गर्वाची गोष्ट आहे. या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘भारत’ यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. हे देशाच्या इतिहासातले सोनेरी पान असून जगभरात त्यांची ‘जागतिक स्तरावरचा नेता’ अशी निर्माण झालेली प्रतिमा भारतासाठी निश्चितच अभिमानास्पद असल्याचा दावाही मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या ट्विटर मधून व्यक्त होताना केला.