नागपूर – राज्यात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्यासाठी आवश्यक दुरुस्त्या करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवला होता. परंतु सध्याच्या कायद्यातील “हार्म आणि हर्ट” या दोन आवश्यक घटकांचा अभाव असल्याने मकोका लागू करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हते. या तरतुदींमध्ये बदल करून गुटखा व्यवसायिकांवर मकोका लागू करता येईल, अशा दुरुस्त्या लवकरच करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
शाळा–महाविद्यालय परिसरातील विक्रेत्यांवर संयुक्त कारवाई
आमदार प्रशांत ठाकूर, अस्लम शेख, अभिमन्यू पवार, रईस शेख आणि अमीन पटेल यांनी शाळा–महाविद्यालय परिसरात अवैध गुटखा विक्री व वहनावर प्रश्न उपस्थित केला होता.
राज्यात गुटखा बंदी असूनही पोलिसांनी व्यापक मोहीम राबवून मोठ्या प्रमाणावर गुन्हे नोंदवले आहेत. विविध जिल्ह्यांतील कारवाई अशी: नवी मुंबई – 1,114, अहिल्यानगर – 185, जालना – 90, अकोला – 35, नाशिक – 131, चंद्रपूर – 230, सोलापूर – 108, बुलढाणा – 664 नागपूर व यवतमाळ – 1,706
शाळा किंवा महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात गुटखा विक्री आढळल्यास टपऱ्या व दुकानांवर संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले असून, ही कारवाई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयाने होणार आहे.

