By: डॉ. अशोक ढवळे
केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर सबंध देशातील निडर क्रांतिकारक वीरांगनांपैकी एक बिनीच्या शिलेदार कॉम्रेड अहिल्याताई रांगणेकर यांचा ८ जुलै १९२२ हा जन्मदिवस आणि १९ एप्रिल २००९ हा स्मृतिदिवस.
अहिल्या रांगणेकर यांचा जन्म ८ जुलै १९२२ रोजी पुण्यात झाला. त्यांचे वडिल त्र्यंबक रणदिवे हे धर्म, जात किंवा लिंगाधारित भेदभावाला सक्रिय विरोध करणारे पुरोगामी व्यक्तिमत्त्व होते. महात्मा जोतीराव फुले आणि इतर दिग्गजांच्या नेतृत्वाखालील सामाजिक सुधारणा चळवळीचे ते पुरस्कर्ते होते. तरुणपणात अहिल्याताईंवर त्यांचे ज्येष्ठ बंधू, कम्युनिस्ट चळवळीतील पहिल्या फळीचे नेते कॉ. बी. टी. रणदिवे यांचा खूप प्रभाव होता. पुणे आणि ठाणे येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी १९४२ साली पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये बी.एस्सी. अभ्यासक्रमात प्रवेश घेतला.
स्वातंत्र्य संग्रामात उडी
८ ऑगस्ट १९४२ रोजी भारत छोडो आंदोलनाला सुरुवात झाली आणि दुसऱ्याच दिवशी संपूर्ण काँग्रेस नेतृत्वाला तुरुंगात टाकण्यात आले. अहिल्या आणि इतर अनेक विद्यार्थिनींनी पुण्यात त्याविरुद्ध मोर्चा काढला. त्या सर्वांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगात या मुलींनी पांढऱ्या, केशरी आणि हिरव्या रंगाच्या साड्या कापून व शिवून त्यावर कोळशाने अशोक चक्र रेखाटून तात्पुरता राष्ट्रध्वज बनवला. तसेच तुरुंगाच्या भिंतीच्या आत एक पिरॅमिड तयार केला आणि तुरुंगाच्या भिंतीवरच अहिल्याताईनी राष्ट्रध्वज फडकावला. या ‘गुन्ह्या’साठी त्यांच्या तुरुंगवासात वाढ करण्यात आली. एवढेच नव्हे, तर या कृत्यासाठी त्यांना फर्ग्युसन कॉलेजमधून देखील काढून टाकण्यात आले. अहिल्याताई मग मुंबईला रुईया कॉलेजमध्ये आल्या आणि आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. एक उत्कृष्ट विद्यार्थी असण्यासोबतच त्या एक उत्तम खेळाडू, अभिनेत्री आणि गायिका देखील होत्या. अनेक पदके आणि पुरस्कार त्यांनी त्यावेळी पटकावले.
१९४३ साली त्या कम्युनिस्ट पक्षात सामील झाल्या आणि स्वातंत्र्य चळवळ आणि श्रमिक महिलांच्या लढ्यात उतरल्या. त्याच वर्षी त्यांनी परळ महिला संघाची स्थापना केली. या संघाने महिला गिरणी कामगारांच्या अनेक यशस्वी संघर्षांचे नेतृत्व केले. या संघटनेचे रूपांतर पुढे श्रमिक महिला संघात आणि नंतर अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेत (AIDWA) झाले.
१९४५ मध्ये मुंबईतील एक प्रमुख विद्यार्थी नेते आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या राष्ट्रीय सहसचिवांपैकी एक असलेल्या पांडुरंग भास्कर रांगणेकर (पीबीआर) यांच्याशी अहिल्याताई विवाहबद्ध झाल्या. पीबीआर नंतर अनेक वर्षे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिवमंडळ सदस्य, राज्याचे कार्यालय सचिव आणि महाराष्ट्रातील विद्यार्थी-युवा आघाड्यांचे अतिशय सक्षम मार्गदर्शक होते. पक्षात ते निःसंशयपणे माझे प्रमुख मार्गदर्शक होते, जशा किसान सभेत गोदावरी परुळेकर होत्या. डिसेंबर २०१२ मध्ये याच स्तंभांत त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना आदरांजलीपर लेख लिहिण्याचा मान मला मिळाला.
फेब्रुवारी १९४६ साली मुंबईत झालेल्या ऐतिहासिक नाविक (रॉयल इंडियन नेव्ही – आरआयएन) बंडाच्या वेळी अहिल्याताईंच्या आयुष्यातील सर्वात चित्तथरारक घटना घडली. काँग्रेस आणि मुस्लिम लीग दोघांनीही या नाविक बंडाला पाठिंबा देण्यास नकार तर दिलाच, शिवाय त्यांच्या नेत्यांनी ब्रिटिशांना शरण जाण्याचा सल्ला नाविकांना दिला. केवळ कम्युनिस्ट पक्षानेच या नाविक बंडाला संपूर्ण आणि सक्रिय पाठिंबा दिला. या नाविक बंडाच्या समर्थनार्थ अविभाजित सीपीआय आणि आयटकच्या नेतृत्वाखाली मुंबईतील कामगार संपावर गेले आणि नाविक बहाद्दरांच्या सोबतीने हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले.
या नाविक बंडात महिला संघटनेच्या वतीने नाविकांना अन्न पुरवण्याचे महत्त्वाचे काम अहिल्याताई व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी इंग्रजांनी नाविकांचे बंड आणि कामगारांचा संप चिरडून काढण्यासाठी अमानुष दडपशाही केली. मुंबईत २५० हून अधिक कामगार गोळीबारात मारले गेले.
अहिल्याताईंना देखील ब्रिटिशांच्या गोळ्यांचा सामना करावा लागला. त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या एक शूर महिला कॉम्रेड कमल दोंदे या पोलिसांच्या गोळीबारात शहीद झाल्या. त्यावेळी तिथे असलेल्या अहिल्याताईंच्या भगिनी कुसुम रणदिवे यांच्याही पायात गोळी घुसली (ही गोळी अखेरपर्यंत त्यांच्या पायात तशीच होती). अहिल्याताई मात्र या गोळीबारातून आश्चर्यकारकरित्या बचावल्या आणि अखेरपर्यंत ब्रिटिशांच्या गोळ्यांचा सामना करत आंदोलकांच्या पाठीशी उभ्या राहिल्या.
जनतेच्या उत्तुंग नेत्या
स्वातंत्र्यानंतर अहिल्याताईंनी १९५०च्या दशकातील ऐतिहासिक संयुक्त महाराष्ट्र चळवळीत स्वतःला झोकून दिले. कम्युनिस्ट पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष यांनी एकत्र येऊन संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केली. या समितीने ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र’ या मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीसाठी अत्यंत तीव्र जनआंदोलन उभे केले. तत्कालीन काँग्रेसच्या राज्य सरकारने त्यात १०६ कामगार आणि शेतकऱ्यांना गोळ्या घालून ठार केले. अहिल्याताईंनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोठ्या प्रमाणात महिलांना एकत्र केले, तुरुंगवास भोगला, लाठीमार सहन केला. प्रख्यात मराठी पत्रकार, लेखक आणि या आंदोलनाचे नेते प्रल्हाद केशव (आचार्य) अत्रे यांनी आपल्या दैनिकात अहिल्याताईंचे यथार्थ वर्णन करणारी ‘रणरागिणी अहिल्या’ अशी कविता लिहिली.
यानंतर अहिल्याताईंनी झोपडपट्टीतील गरिबांना संघटित करण्यात आणि त्यांना मदत करण्यात स्वतःला झोकून दिले. १९६१ साली त्या मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या. १९७७ पर्यंत त्या सतत नगरसेविका म्हणून निवडून येत राहिल्या. महानगरपालिकेत त्यांनी कायम गरिबांच्या, कामगारांच्या आणि झोपडपट्टीतील लोकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न उपस्थित केले. त्यांच्यामध्ये त्या अत्यंत लोकप्रिय होत्या. झोपडपट्टीवासीयांच्या अनेक निदर्शनांचे आणि आंदोलनांचे नेतृत्व त्यांनी केले. मुंबई शहरातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या प्रत्येक संघर्षातही त्या सतत सक्रिय होत्या.
१९६२ मध्ये भारत-चीन युद्धादरम्यान अहिल्याताईंना अटक झाली आणि वाटाघाटीद्वारे सीमा विवादावर तोडगा काढण्याची भूमिका घेतल्याबद्दल तुरुंगवासही भोगावा लागला. इतर अनेक कम्युनिस्ट नेत्यांसह, १९६२ ते १९६६ पर्यंत साडेतीन वर्षे त्या तुरुंगात राहिल्या. उजव्या दुरुस्तीवादाविरुद्धच्या कडव्या संघर्षानंतर, ऑक्टोबर-नोव्हेंबर १९६४ मध्ये कोलकाता येथे ७व्या पक्ष काँग्रेसमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. १९६७ मध्ये पक्षात डाव्या एकांगी नक्षलवादी प्रवृत्तीचा उदय झाला, त्यावेळी अहिल्याताई पक्षासोबत ठामपणे उभ्या राहून या कट्टर अतिडाव्या प्रवृत्तीविरुद्ध लढल्या.
१९७० साली कोलकाता येथे सीटूच्या स्थापनेनंतर इतर अनेक नेत्यांसोबत अहिल्याताईंनी महाराष्ट्रात सीटूच्या बांधणीला सुरुवात केली आणि लवकरच त्या महाराष्ट्र सीटूच्या उपाध्यक्ष निवडल्या गेल्या. १९७५ साली मुंबईत सीटूचे अखिल भारतीय अधिवेशन झाले, त्यात आणि त्यानंतर १९८७ साली पुन्हा मुंबईत झालेल्या अखिल भारतीय अधिवेशनाच्या स्वागत समितीच्या एक नेत्या म्हणून इतर अनेकांसोबत या दोन्ही अधिवेशनांत त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. १९७५ साली सीटूच्या राष्ट्रीय जनरल कौन्सिलवर त्या निवडल्या गेल्या.
१९७०च्या दशकाच्या सुरुवातीला मुंबई-महाराष्ट्रात जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीविरोधात महिलांची अनेक मोठी संयुक्त आंदोलने झाली. अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, तारा रेड्डी आणि इतर महिला नेत्यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिलांचे ‘लाटणे मोर्चे’ त्या काळात निघाले. राज्यात राजकीय परिणाम करण्याइतके हे मोर्चे गाजले.
१९७५ साली इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेस सरकारने देशावर आणीबाणी लादली आणि जनतेचे लोकशाही अधिकार पायदळी तुडवले. अहिल्याताईंनी या आणीबाणीला विरोध केला आणि त्याची शिक्षा होऊन त्यांना १९७५ ते १९७७ दरम्यान १९ महिने तुरुंगवास ठोठावण्यात आला. इंदिरा गांधी सरकारच्या हुकुमशाही धोरणाविरुद्ध सगळा देश पेटून उठला.
महाराष्ट्रात झालेल्या प्रत्येक लोकप्रिय आंदोलनात बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे अहिल्याताईंना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने १९७७च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून उभे केले आणि कॉँग्रेस उमेदवाराविरुद्ध त्या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या. त्याच वेळी लहानू कोम (डहाणू) आणि गंगाधरअप्पा बुरांडे (बीड) हे देखील महाराष्ट्रातून पक्षातर्फे उभे राहिले आणि खासदार म्हणून निवडून आले. लोकसभेत खासदार म्हणून अहिल्याताईंनी महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेचे अनेक प्रश्न उपस्थित केले आणि लावून धरले.
१९७८ साली जालंदर येथे झालेल्या पक्षाच्या १०व्या कॉँग्रेसमध्ये अहिल्याताईंची पक्षाच्या केंद्रीय कमिटीवर निवड झाली. अशाप्रकारे महाराष्ट्रातील दोन महिला अनेक वर्षे पक्षाच्या केंद्रीय कमिटी सदस्य होत्या – पहिल्या, ज्येष्ठ शेतकरी नेत्या गोदावरी परुळेकर (ज्यांची त्याच्या एका दशकापूर्वी केंद्रीय कमिटीवर निवड झाली होती) आणि नंतर अहिल्या रांगणेकर. वय आणि प्रकृतीच्या कारणास्तव त्या पदावरून निवृत्त होईपर्यंत, म्हणजे २००५ सालापर्यंत तब्बल २७ वर्षे ही जबाबदारी अहिल्याताईंनी समर्थपणे पार पाडली.
१९८३ ते १९८६ पर्यंत, अहिल्याताई महाराष्ट्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिव होत्या. पक्षाच्या आतापर्यंतच्या त्या देशातील एकमेव महिला राज्य सचिव आहेत. डोळ्यांचा आजार बळावल्याने त्यांना हे पद सोडावे लागले. त्याआधी आणि त्यानंतरही अनेक वर्षे त्या पक्षाच्या राज्य सचिवमंडळात कार्यरत होत्या.
१९७९ साली अहिल्याताई सीटूच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष झाल्या. त्याच वर्षी चेन्नई येथे भरलेल्या कामकाजी महिलांच्या पहिल्या अखिल भारतीय अधिवेशनात विमल रणदिवे, सुशीला गोपालन यांच्या साथीने त्यांनी मोलाची भूमिका बजावली. या अधिवेशनात कामकाजी महिलांच्या पहिल्या अखिल भारतीय समन्वय समितीची स्थापना झाली. या समितीने पुढे कामकाजी महिलांचे कार्य मजबूत करण्याचे आणि संघटनेत सर्व पातळ्यांवर महिलांचे नेतृत्व पुढे आणण्याचे काम केले.
१९८१ साली चेन्नई अधिवेशनात स्थापन झालेल्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या अहिल्याताई एक संस्थापक नेत्या होत्या. या अधिवेशनात त्यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. पुढे अनेक वर्षे त्या या पदावर कार्यरत होत्या. नंतर त्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष झाल्या. पुढे त्यांना अभाजमसंच्या सल्लागार म्हणून सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र जमसंच्या तर त्या अनेक वर्षे राज्य अध्यक्ष होत्या. जमसं आणि सीटू या दोन्ही संघटनांत अनेक वर्षे त्या कार्यरत होत्या आणि त्यांच्या प्रत्येक लढ्यात सहभागी होत्या.
जेव्हा जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्या आदेशावरून भारतावर खाजगीकरण- उदारीकरण- जागतिकीकरण (खाऊजा) धोरण लादले गेले, तेव्हा पक्ष, कामगार संघटना आणि महिला संघटनांनी पुकारलेल्या सर्व मोहिमा आणि संघर्षांत अहिल्याताई अग्रभागी होत्या. धर्मांधता, जातपातवाद आणि सर्व प्रकारच्या लैंगिक भेदभावाच्या त्या कट्टर विरोधक होत्या. दृष्टी क्षीण झाली असली तरी वयाची ऐंशी ओलांडूनही प्रत्यक्ष कार्यात सहभागी होण्याचा त्यांचा उत्साह हे तरुण पिढीसाठी नेहमीच एक प्रेरणादायी उदाहरण राहील.
८ फेब्रुवारी २००८ रोजी वयाच्या ९५व्या वर्षी अहिल्याताईंचे पती पी. बी. रांगणेकर यांच्या झालेल्या निधनाचा त्यांच्यावर साहजिकच मोठा परिणाम झाला. ६३ वर्षांची भागीदारी संपुष्टात आली. या दोघांनीही आपले संपूर्ण आयुष्य पक्ष आणि जनआंदोलनाला वाहून घेतले होते. जेमतेम वर्षभरानंतर १९ एप्रिल २००९ रोजी वयाच्या ८७व्या वर्षी अहिल्याताईंनी अखेरचा श्वास घेतला. त्यातील तब्बल ६७ वर्षे त्यांनी नि:स्वार्थपणे कम्युनिस्ट पक्षाला समर्पित केली होती. त्यांच्या अंत्ययात्रेला पक्षातील आणि पक्षाबाहेरीलही हजारो लोक आले आणि अक्षरशः रडले. अहिल्याताईंच्या पश्चात त्यांची दोन मुले अजित आणि अभय आणि त्यांचे कुटुंबिय असा परिवार आहे.
एक विलक्षण व्यक्तिमत्व
अहिल्याताई रांगणेकर एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. लोकांची कामे करण्यात त्यांना मदत करणे, हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते. त्यासाठी मुंबईतील मंत्रालयात त्या अनेकदा जात असत. मुख्यमंत्री आणि मंत्री, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, अहिल्याताई त्यांच्या केबिनमध्ये जाताच आदराने उभे राहात, इतका त्यांचा नैतिक दरारा होता. मंत्र्यांना भेटण्यासाठी त्या कधी अपॉइंटमेंट घेत नसत, तडक केबिनमध्ये जात असत. फक्त लोकांच्या न्याय्य मागण्या घेऊन त्या जात असल्याने, त्या मान्य करण्यास कधीही कोणीही नकार देऊ शकत नव्हते. मी स्वतः अनेकदा याचा अनुभव घेतला आहे.
चार दशकांपूर्वी, आम्ही एसएफआयमध्ये असताना विविध प्रश्नांवरील संघर्ष, उग्र निदर्शने, रस्ता रोको अशी अनेक आंदोलने आम्ही केली. अगदी मंत्रालयात घुसून अनेक मंत्र्यांना घेरावही घातला. आमच्यावर लाठीचार्ज झाला, अटक करण्यात आली. आम्हाला अटक झाल्यावर पोलीस स्टेशनात येणारी हमखास पहिली व्यक्ती असायची त्या म्हणजे आमच्या ‘अहिल्याताई’. आम्ही सगळ्यांनीच अत्यंत प्रेमादराने त्यांना दिलेले ते संबोधन होते.
त्या जरी कधी सत्तेत नसल्या, तरीही अनेक दशके मुंबईतील त्यांच्या घरी दररोज सकाळी लोकांचा अक्षरशः दरबारच भरत असे. समाजाच्या सर्व स्तरातील लोक त्यांच्या घरी गर्दी करायचे आणि त्यांना आपल्या अडचणी सांगायचे. त्यांना अधिकाधिक मदत अहिल्याताई करायच्या. या व्यापक संवादामुळेच लोकांची नाडी त्या अचूकपणे ओळखीत. त्यांच्या या कौशल्याची पक्षाच्या राज्य सचिवमंडळात भविष्यातील कार्याविषयी निर्णय घेताना आम्हाला नेहमी मदत होत असल्याचे मला आजही आठवते.
आपल्या अत्यंत साध्या राहणीमुळे अहिल्याताई सर्व कॉम्रेड्सना प्रिय होत्या. साधेपणा आणि नम्रता त्यांनी कायम जपली. कितीही वैचारिक आणि राजकीय मतभेद असले, तरी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना त्यांच्याबद्दल नितांत आदर होता. सहा दशकांच्या राजकीय जीवनात त्यांनी केलेल्या प्रचंड त्यागाची आणि निष्कलंक सचोटीची ती पावती होती. कम्युनिस्ट नेता कसा असावा, याचे अहिल्याताई म्हणजे एक आदर्श उदाहरण होत्या.
मार्क्सवाद-लेनिनवादावर त्यांची अढळ श्रद्धा होती. देश, जनता आणि आपल्या पक्षाबद्दल त्यांना असलेल्या काळजी आणि प्रेमाला काही सीमाच नव्हती. आम्ही दोघेही पक्षाच्या केंद्रीय कमिटीच्या बैठकीसाठी एकत्र दिल्लीला जात असू तेव्हा आमच्यात झालेल्या चर्चेतून मला नेहमीच याचा प्रत्यय येत असे. त्या माजी खासदार असल्याने मी त्यांच्यासोबत मोफत प्रवास करायचो, आणि त्यांच्या उतार वयात त्यांची शक्य ती सर्व काळजी घ्यायचो.
अहिल्याताईंविषयीच्या माझ्या शेवटच्या आठवणी म्हणजे त्यांच्या अखेरच्या वर्षभरात त्यांचे मला नियमितपणे येत असलेले फोन. मी त्यावेळी पक्षाचा महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी होतो आणि आपल्या मुंबईतील राज्य केंद्राच्या ‘जनशक्ती’ या कार्यालयात उशिरापर्यंत असायचो. त्या मला पक्षात आणि जनसंघटनांत नवीन काय चालले आहे हे फोनवर आवर्जून विचारायच्या. “अशोक, मी आता कुठेही बाहेर जाऊ शकत नाही, डोळे अधू झाल्यामुळे आपल्या पक्षाचे पेपर वाचू शकत नाही, रांगणेकर देखील आता राहिले नाहीत, म्हणून तुला त्रास देते रे,” असं म्हणायच्या. त्यांच्या या विलक्षण समर्पण वृत्तीने माझ्या डोळ्यांत अनेकदा अश्रू येत असत आणि पक्षाच्या कामाचा सर्व तपशील मी त्यांना सविस्तरपणे सांगत असे.
अशी नेती पुन्हा होणे नाही!
कॉम्रेड अहिल्या रांगणेकर अमर रहे!
कॉम्रेड अहिल्या रांगणेकर यांच्या स्मृतीला लाल सलाम!