मुंबई : राज्यभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना सरकारकडून अजूनही मदतीची घोषणा न झाल्याने काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. “शेतकऱ्यांना वा-यावर सोडणाऱ्या महाभ्रष्ट महायुती सरकारविरोधात” शुक्रवार, ३ ऑक्टोबरपासून राज्यभर रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा आज प्रदेश काँग्रेसने केली.
गेल्या महिनाभरात राज्यातील १०० लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील शेती, फळबागा आणि पिकांचे नुकसान झाले आहे. लाखो शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त झाले असून हजारो जनावरे दगावली, लाखो घरे जलमय झाली आणि अन्नधान्य व वस्तूंची प्रचंड नासाडी झाली आहे. हजारो कुटुंब बेघर झाले आहेत. तरीदेखील सरकारकडून ना ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला, ना मदतीचा ठोस निर्णय घेण्यात आला, अशी काँग्रेसची टीका आहे.
काँग्रेसने मागणी केली आहे की, तातडीने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून प्रति हेक्टर किमान ५० हजार रुपयांची मदत द्यावी आणि विधानसभा निवडणुकीतील आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. मात्र, “सत्तेच्या मस्तीत बेजबाबदार झालेले सरकार हे संकट दुर्लक्षून बसले आहे,” असा आरोप काँग्रेसने केला.
या “मूक-बहि-या” सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ३ ऑक्टोबरपासून सर्व जिल्ह्यांत मोर्चे, धरणे आणि आंदोलन होणार आहेत. जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोचवल्या जाणार असल्याचेही काँग्रेसने स्पष्ट केले.