महाराष्ट्र ताज्या बातम्या

अजितदादा एकनिष्ठ मंत्र्यांविरोधात राष्ट्रवादीतच षडयंत्राची सुरुवात?

ajit pawar

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातातील मृत्यूनंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे कुणाकडे जाणार, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. अजितदादांच्या पत्नी व विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची जबाबदारी द्यावी, यासाठी दबाव निर्माण करणारे सहकार मंत्री नरहरी झिरवळ यांच्याविरोधातच आता पक्षांतर्गत राजकीय दबावतंत्र वापरून अडचणी निर्माण करण्याचे सुनियोजित षडयंत्र सुरू झाल्याची माहिती पक्षातीलच एका ज्येष्ठ व अनुभवी नेत्याने दिली आहे.

मूळ एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून स्वतंत्र गट स्थापन करत, पक्ष व निवडणूक चिन्ह ताब्यात घेत भाजप–शिवसेना युती सरकारमध्ये तब्बल ४० आमदारांसह सहभागी होताना अजितदादा पवार यांनी स्वतः उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री व राज्य उत्पादन शुल्क ही महत्त्वाची खाती स्वीकारली होती. त्याचवेळी आपल्या अत्यंत विश्वासू दहा नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लावण्यात आली होती.

याच काळात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अनेक नावांचा विचार सुरू असताना, याच एका ज्येष्ठ व वजनदार नेत्याची नजरही त्या पदावर होती. मात्र बहुसंख्य आमदार, कार्यकर्ते व पक्षातील नेत्यांनी अजितदादांच्याच नावावर शिक्कामोर्तब केल्याने अखेर राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे अजित पवार यांच्याच गळ्यात पडली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजितदादांचा विमान अपघातात अकाली मृत्यू झाल्यानंतर पक्षाचे नेतृत्व कुणाकडे जाणार, यावरून पक्षातील लहान–मोठ्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असतानाच, या चाणाक्ष नेत्याने “राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा पूर्णतः खोटी आहे,” असे कोणीही चर्चा न करता जाहीर विधान केले. या माध्यमातून पक्षातील नेत्यांना ‘योग्य संकेत’ देण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे.

मात्र अजितदादांच्या हयातीत ज्या-ज्या नेत्यांना या तथाकथित ‘क्रियाशील’ नेत्याच्या कुटिल कारवायांचा फटका बसला होता, त्या सर्वांनी एकत्र येत सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद असावे, यासाठी जोर लावला. दिल्ली दौऱ्यावर असताना, माध्यमांसमोर बोलताना सहकार मंत्री नरहरी झिरवळ यांनी उघडपणे सुनेत्रा पवार यांच्या नावाला पाठिंबा जाहीर केला. इतकेच नव्हे, तर दादा समर्थक आमदारांचा एक मोठा गटही त्यांनी उभा केला.

यामुळे संतप्त झालेल्या त्या नेत्याने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हाताशी धरत, मंत्री नरहरी झिरवळ यांना मंत्रिमंडळातून हटवण्यासाठी सुनियोजित हालचाली सुरू केल्याचा आरोप होत आहे. गुरुवारी मंत्रालयात झिरवळ यांच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घडवून आणलेली कारवाई, तसेच त्यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला लक्ष्य करत केलेली अटक, ही सर्व कारवाई आधीपासून आखलेल्या कटाचा भाग असल्याचा दावा केला जात आहे. या कारवाईची सलग दोन दिवस माध्यमांत चर्चा व्हावी, यासाठीही नियोजन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

झिरवळ प्रकरणानंतरही हालचाली थांबलेल्या नाहीत. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर अजितदादांचे कट्टर समर्थक आमदार अमोल मिटकरी आणि पुण्यातील पदाधिकारी ठोंबरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी करणारे लेखी निवेदन दिले. यावेळी मंत्री नरहरी झिरवळ आणि बाबासाहेब पाटील हेही उपस्थित होते.

यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे की, ही कृती ज्या नेत्याला खटकली, त्याचा पुढचा ‘टार्गेट’ कोण? राजकीय वर्तुळात विद्यमान सहकार मंत्री आणि अजितदादांचे कट्टर समर्थक हेच पुढील लक्ष्य असतील, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात