महाराष्ट्र ताज्या बातम्या

पिकं बुडाली, आशा संपल्या — कोकणातील शेतकरी उद्ध्वस्त..!

”ओला दुष्काळ जाहीर करा” — कोकणातील शेतकऱ्यांचा आक्रोश शासनापर्यंत पोचेल का?

महाड — कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे आयुष्य पुन्हा एकदा पावसाच्या टोकावर लोंबत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले असून, भातशेतीसाठी वरदान ठरणारा पाऊस आता शेतकऱ्यांच्या विनाशाचे कारण बनला आहे.

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाहून जात असताना शासन आणि लोकप्रतिनिधी मात्र आगामी नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या राजकारणात गर्क आहेत. स्वतःचा मुलगा, सून, पुतण्या किंवा भाचा यांना उमेदवारी कशी मिळेल, कोणत्या समितीचा अध्यक्षपद कसे मिळवता येईल — या गणितात राजकारणी व्यस्त आहेत.

पावसाने केला कहर, शेतकऱ्यांचा जीव टोकावर

गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने कोकणातील शेती अक्षरशः उध्वस्त केली आहे. हजारो हेक्टर क्षेत्रातील भात, नागली आणि वरई पिकं चिखलात गाडली गेली आहेत. सुरुवातीला दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू आता निराशेच्या ओलसर रेषांनी बदलले आहे. चार मेपासून सुरू झालेला पाऊस थांबायचं नाव घेत नाही. नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत, तर शेतं पाण्याखाली गेली आहेत. गेल्या वर्षी दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांवर यंदा अतिवृष्टीचा प्रकोप ओढवला आहे.

भातपिकं लोंब्या काढत असतानाच पावसाने सगळं बिघडवलं आहे. सततच्या पावसामुळे आणि ऊन न मिळाल्याने भातपिकं कुजण्याच्या मार्गावर आहेत. या वर्षी कोकणात सुमारे ४,००० मि.मी. पाऊस पडला — म्हणजे गेल्या वर्षाच्या दुप्पट! तरीही शासनाने “ओला दुष्काळ” घोषित करण्याची तयारी दाखवलेली नाही.

रोगराईचा प्रादुर्भाव, खतं-औषधं वाया

अतिपावसामुळे भातपिकांवर बगळा आणि खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. रोगनियंत्रणासाठी औषधफवारणी अपरिहार्य असली तरी सततच्या पावसामुळे ती करणे अशक्य झाले आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या घरात साठवलेले युरिया खत पाण्यात भिजून वाया जात आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर औषध आणि खतांचा अतिरिक्त भार पडला आहे. शासनाकडून मोफत औषध किंवा मदतीची कोणतीही हालचाल झालेली नाही.

“शेतकरी अडचणीत आला की सरकारला फक्त ‘आढावा बैठक’ आठवते,” असा शेतकऱ्यांचा संताप आहे. बैठकीनंतर मात्र काहीच बदल होत नाही — सत्ताधाऱ्यांचे दौरे, फोटोसेशन आणि आश्वासनं सुरू राहतात, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून आशा वाहून जातात.

लोकप्रतिनिधी मौनात, शेतकरी मात्र हवालदिल

मतांच्या हंगामात “शेती हे आमचं प्राधान्य” असं सांगणारे लोकप्रतिनिधी आज मौन बाळगून बसले आहेत. शेतकऱ्यांच्या आयुष्यावरचं पाणी वाहून गेलं, पण सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावरची संवेदना मात्र सुकलेली दिसते.

कोकणातील प्रत्येक तालुक्यातील परिस्थिती गंभीर असून शेतकऱ्यांच्या मागण्या अगदी स्पष्ट आहेत — शासनाने तात्काळ “ओला दुष्काळ” जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर नुकसानभरपाई द्यावी, रोगग्रस्त पिकांसाठी मोफत औषध आणि खत वितरण सुरू करावे, स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा.

हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला

शेतकऱ्यांच्या शेतातील माती केवळ जमीन नाही — ती त्यांच्या घामाची, मेहनतीची आणि अस्तित्वाची ओळख आहे. पण आज हीच माती चिखलात रूपांतरित झाली असून त्या चिखलात शेतकऱ्यांची स्वप्नं, आशा आणि भविष्य बुडत आहे. शासनाची उदासीनता आणि लोकप्रतिनिधींचं निवडणूक व्यस्तता हेच शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळत आहे.

आता वेळ आली आहे की मायबाप सरकार आणि लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत, त्यांचे अश्रू पुसावेत. पण सध्याची स्थिती अशी की, सगळेच सत्तेच्या खेळात गुंतले आहेत — आणि शेतकरी पुन्हा एकदा एकटा पडला आहे.

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात