ठाणे – ठाणे महानगरपालिकेच्या विकासकामांना चालना देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. तसेच, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका समस्या आणि विकासकामांबाबत प्रताप सरनाईक म्हणाले, ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लवकरच पावले उचलली जाणार आहेत. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण केली जाणार आहेत. विकासकामांना चालना देण्यासाठी करोडो रुपयांचा निधी ठाणे महानगरपालिकेला उपलब्ध होणार आहे. डीपी (विकास आराखडा) आणि टाऊन प्लॅनबाबत नागरिकांना विश्वासात घेण्याचे काम सुरू आहे. हरकती आणि त्रुटींचे निराकरण महापालिकेच्या स्तरावरच केले जाईल. डीपी प्लॅनबाबत लेखी स्वरूपात तक्रार करावी, परंतु माध्यमांसमोर उथळ टीका करून आराखड्याला धक्का लावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
“लाडकी बहीण” योजनेवर भाष्य करताना प्रताप सरनाईक म्हणाले की, आधी ठरवलेले निकष योग्यरित्या लागू करण्यात आले. कोणीही गैरफायदा घेतला असेल, तर तो निधी शासनाला परत द्यावा लागेल.
एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावर लवकरच राजकीय नियुक्ती केली जाईल असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावर नेहमीच राजकीय व्यक्ती असते. मध्यंतरी हे पद भरत गोगावले यांना दिले होते, मात्र ते मंत्री झाल्याने ते रिकामे झाले. सध्या तात्पुरत्या स्वरूपात विभागाचे सचिव संजय सेठी यांना संधी देण्यात आली आहे. लवकरच एका राजकीय नेत्याची या पदावर नियुक्ती केली जाणार आहे. “मी या खात्याचा मंत्री आहे, त्यामुळे सर्व जबाबदारी माझी आहे,” असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.