मुंबई : शब्दांना सौंदर्याची किनार लाभली, अक्षरांनी कलात्मकतेचा साज चढला आणि ‘कागदावर उतरली एक नयनरम्य जादू’ – हे दृश्य होते मुंबई मराठी पत्रकार संघ आयोजित सुलेखन कार्यशाळेचे. या कार्यशाळेत सर्व वयोगटातील सहभागी अक्षरांच्या जादुई दुनियेत मनापासून रमून गेले.
कार्यशाळेचे मार्गदर्शन सुप्रसिद्ध सुलेखनकार सुदीप गांधी यांनी केले. त्यांच्या कुशल आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी सुलेखनाच्या सौंदर्यात मनःपूर्वक भाग घेतला. कार्यशाळेच्या प्रारंभापासूनच उत्सुकता, कुतूहल आणि आनंद यांचे वातावरण होते. ‘अ’ पासून ‘ज्ञ’ पर्यंत प्रत्येक अक्षराशी नव्याने मैत्री करत, विविध फॉन्ट्स, स्ट्रोक्स, वळणं आणि रचनांचा सराव करण्यात आला.
कार्यशाळेतील प्रमुख आकर्षण ठरली सुदीप गांधी यांची मनोहारी प्रात्यक्षिकं. त्यांनी अक्षररचनेचे सौंदर्य, शैली विकास, तसेच कॅलिग्राफीचा वैयक्तिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक उपयोग याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या सादरीकरणाने सर्वजण अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
कार्यशाळेत सहभागी झालेल्या बालगोपाळांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. “हाताने लिहिलेली अक्षरं इतकी सुंदर दिसू शकतात, हे आज लक्षात आलं,” अशी प्रतिक्रिया एका आठ वर्षांच्या मुलीने दिली. तर काही वयोवृद्धांनी, “ही कला शिकताना जुन्या शालेय आठवणींना उजाळा मिळाला,” अशी भावना व्यक्त केली.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी अर्थखात्याचे उपसचिव विनायक धोत्रे आणि सुदीप गांधी यांच्या हस्ते प्रत्येक सहभागीला प्रमाणपत्र देण्यात आले. उपस्थितांनी संयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, उपाध्यक्ष व संकल्पक राजेंद्र हुंजे व स्वाती घोसाळकर, कोषाध्यक्ष जगदीश भोवड, कार्यकारिणी सदस्य राजेश खाडे, विनोद साळवी, तसेच अंतर्गत हिशोब तपासनीस हेमंत सामंत यांचे विशेष योगदान लाभले.
ही केवळ एक कार्यशाळा नव्हती, तर शब्दांनी आणि अक्षरांनी नवे क्षितिज गाठण्याचा, सौंदर्याची पुनःशोध घेण्याचा एक प्रेरणादायी प्रवास होता, अशी भावना सहभागी आणि उपस्थितांनी व्यक्त केली.