दीड लाख अधिकारी मुख्यमंत्री सहायता निधीस एक दिवसाचे वेतन देतील
मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मोठा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर २०२५ महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याची माहिती महासंघाचे अध्यक्ष नितीन काळे, सरचिटणीस समीर भाटकर, कोषाध्यक्ष संतोष ममदापुरे आणि दुर्गा महिला मंच अध्यक्षा सिद्धी संकपाळ यांनी दिली.
ढगफुटीसदृश अतिवृष्टीमुळे राज्यातील शेती तसेच नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. या कठीण काळात राज्य शासनासह अधिकारीही जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. राज्य शासनाच्या आपत्ती निवारण उपक्रमांना बळकटी मिळावी यासाठी दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीस अर्पण करण्याचा निर्णय घेतल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पत्र पाठवून या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासन व समाजासोबत राहणे ही आमची जबाबदारी आहे. याआधीही अनेक वेळा अशा प्रसंगी अधिकारी वर्गाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक दिवसाचे वेतन दिले असून, ही परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे.”
विशेष म्हणजे, कार्यरत अधिकाऱ्यांबरोबरच अनेक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनीही आपले एक दिवसाचे निवृत्तीवेतन देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे या मदतीचा आवाका आणखी वाढणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या संदर्भातील शासन आदेश सत्वर काढावा, अशी मागणी महासंघाने शासनाकडे केली आहे. पत्राच्या प्रती मुख्य सचिव तसेच वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांना देण्यात आल्या आहेत.