धुळे : लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी खानदेशच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या स्वप्नातील प्रकल्प आता साकार होत आहेत. सुलवाडे–जामफळ सिंचन प्रकल्प, नरडाणा औद्योगिक क्षेत्र, मनमाड–इंदूर रेल्वेमार्ग, सहा राष्ट्रीय महामार्ग आणि अक्कलपाडा प्रकल्प यामुळे खानदेशचा कायापालट होणार आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
धुळे येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांना ‘लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.
आमटे कुटुंबाचा सन्मान
मुख्यमंत्री म्हणाले, “डॉ. प्रकाश आमटे यांनी हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प उभारून आदिवासी समाजासाठी आरोग्य, शिक्षण, शेती, जलसंधारण, महिलांच्या सक्षमीकरणासह जीवनमान उंचावण्यासाठी अद्वितीय कार्य केले आहे. या कार्यात सौ. मंदाकिनी आमटे यांनी मोलाची साथ दिली असून, आता आमटे कुटुंबाची तिसरी पिढीही या चळवळीत कार्यरत आहे. हा प्रकल्प भारतातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे.”
त्यांनी स्व. बाबा आमटे यांच्या कार्याचीही आठवण करून दिली. “कुष्ठरोगी आणि समाजातील वंचित घटकांसाठी त्यांनी केलेली सेवा देशाला नवा मार्ग दाखवून गेली. भारत जोडो यात्राच्या माध्यमातून एकतेचा संदेशही त्यांनी दिला,” असे ते म्हणाले.
दाजीसाहेब पाटीलांचे स्मरण
लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटीलांविषयी मुख्यमंत्री म्हणाले, “ते सभागृहातील सर्वसमावेशक नेत्यांपैकी एक होते. संघर्षाच्या क्षणीही शांतपणे मुद्दा मांडण्याची कला त्यांच्याकडे होती. खानदेशाच्या प्रश्नांवर ते सतत आग्रही राहिले. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास जाताना आज दिसत आहे.”
मोठ्या प्रकल्पांची घोषणा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी उत्तर महाराष्ट्रासाठी केंद्र व राज्य सरकारने हाती घेतलेल्या प्रकल्पांची माहिती दिली.
• मनमाड–इंदूर रेल्वे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वेसाठी तब्बल ₹18,000 कोटी मंजूर केले.
• सहा राष्ट्रीय महामार्ग: लवकरच पूर्ण होऊन धुळे व आसपासचा परिसर महाराष्ट्रातील वाहतूक केंद्र बनेल.
• नरडाणा प्रकल्प: या औद्योगिक केंद्रामुळे धुळे जिल्ह्यात गुंतवणुकीचे नवे दार खुले होणार.
• अक्कलपाडा प्रकल्प: या प्रकल्पासाठी भूसंपादनास मान्यता देण्यात आली असून निधी उपलब्ध करून तो शंभर टक्के कार्यान्वित केला जाईल.
डिफेन्स कॉरिडॉर आणि रोजगार संधी
फडणवीस म्हणाले, “काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन अतिवृष्टीग्रस्त महाराष्ट्रासाठी भरीव मदतीची मागणी केली. त्याच वेळी महाराष्ट्रात तीन डिफेन्स कॉरिडॉर उभारण्याची मागणी केली आहे. त्यापैकी एक नाशिक–धुळे कॉरिडॉर असेल. या माध्यमातून खानदेशातील युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.”
नंदुरबारमध्येही गुंतवणुकीचे नवे प्रकल्प सुरू असून शेतीबरोबरच औद्योगिक महत्त्व वाढविण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मध्यप्रदेश सरकारचे मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी भूषवले. तसेच मंत्री जयकुमार रावल, मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार कुणाल रोहिदास पाटील, आमदार, खासदार आणि विविध मान्यवर उपस्थित होते.