पुणे : वाढत्या मानव–वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जुनाट झालेल्या वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये तातडीने सुधारणा करणे अत्यावश्यक असून, त्यासाठी ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांच्याशी थेट चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
याबाबतचे सविस्तर पत्र त्यांनी ई-मेलद्वारे मुख्यमंत्री कार्यालयात पाठवले आहे.
माने यांनी पत्रात नमूद केले आहे की, “मानवाचा पर्यावरणातील हस्तक्षेप अमर्यादित वाढला असून, होत चाललेली बेसुमार जंगलतोड ही वन्यजीव–मानव संघर्षाची मूळ कारणे आहेत. जंगल नष्ट झाल्याने रानडुक्कर, बिबटे, हत्ती यांसारखे प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांकडे वळत आहेत. परिणामी माणसांवर तसेच पाळीव जनावरांवर हल्ल्यांची संख्या वाढत आहे.”
ते पुढे म्हणतात, “सध्या प्रचलित असलेला वन्यजीव कायदा हा बदलत्या परिस्थितीत अपुरा ठरत असून, काळानुरूप त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने तातडीने डॉ. माधवराव गाडगीळ यांच्याशी सविस्तर चर्चा करावी. नुकत्याच झालेल्या संवादात त्यांनी अनेक व्यावहारिक उपाय सुचवले आहेत. त्यांच्या सूचना लक्षात घेऊन शासनाने सक्षम अधिकारी त्यांच्या मार्गदर्शनासाठी पाठवावेत आणि आवश्यक ते बदल त्वरित अंतिम करावेत.”
माने यांनी पत्राच्या शेवटी शासनाला विनंती केली आहे की, वन्यप्राणी–मानव संघर्ष थांबवण्यासाठी वैज्ञानिक उपाययोजना तात्काळ राबवाव्यात आणि गाडगीळ यांच्या मार्गदर्शनातून कायद्यात आवश्यक सुधारणा करून प्रभावी धोरण घोषित करावे.

