X: @Rav2Sachin
मुंबई : दोन वर्षापूर्वी अग्नीशामक पदाच्या ९१० जागांसाठी करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील दिव्यांगाच्या ३७ जागा वगळून ८७३ जगांमधील १३७ जागा आजही रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. या जागा भरण्यासाठी प्रतिक्षा यादी जाहीर न करताच भरतीतील उत्तीर्ण उमेदवारांना हक्काच्या नोकरीपासून डावलण्यात आल्याने त्यांनी आझाद मैदानात बेमुदत आंदोलन सुरु केले आहे.
अग्निशामक पदाच्या 910 रिक्त जागा भरण्याकरिता 13.01.2023 ते 14.02.2023 या कालावधीत दहिसर पश्चिम येथील लोकनाथ गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान) येथे भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. या भरतीत एकूण 42,534 उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी 24,053 उमेदवार अपात्र ठरले व 18,481 उमेदवार संपूर्ण भरती अंतर्गत पात्र ठरले.
पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून 873 उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड यादी तयार करण्यात आली. ही यादी मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. तर दिव्यांगासाठी 39 जागा भरण्यासंदर्भातील प्रश्न शासन दरबारी पाठविण्यात आलेला आहे.
दरम्यान, निवड यादीतील जे उमेदवार वैद्यकीय तपासणीकरीता हजर होणार नाहीत, अशा उमेदवारांच्या जागी गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवार घेण्यात यावे, त्याकरिता प्रतीक्षा यादी बनविण्यास व ही प्रतिक्षा यादी तत्कालीन आयुक्त यांच्या मंजुरीच्या दिनांकापासून सहा महिन्यापर्यंत वैध ठरेल, असे अभिप्राय देण्यात आले होते.
तत्कालीन आयुक्त यांच्या मंजुरी अन्वये अग्नीशामक पदाच्या एकूण रिक्त पदांच्या 30 टक्के प्रवर्ग निहाय एकूण 277 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली होती. पण प्रतिक्षा यादी बनविण्यात आली तरी प्रत्यक्ष एकही उमेदवार घेण्यात आलेले नाहीत. प्रतिक्षा यादीच्या सहा महिन्यांच्या कालावधी नुसार, नोव्हेंबर 2023 मध्ये प्रतिक्षा यादी नियमाने रद्द झाली.
आता अग्नीशामक पदी 873 उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड यादी करण्यात आली असली तरी आतापर्यंत एकूण 736 उमेदवारांची नियुक्ती झालेली असून 137 जागा रिक्त असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यानी दिली.
अग्नीशामक पदाच्या 750 जागांसाठी 2015 – 16 च्या भरती दरम्यान 101 रिक्त असलेल्या जागा या प्रतिक्षा यादी नुसार भरल्या गेल्या होत्या, अशी माहिती अग्निशमन दलाच्या माजी वरीष्ठ अधिकारी यांनी दिली.
वर्ष 2015 – 16 मध्ये अग्निशामक पदाची भरती प्रक्रिया वर्षभर करताना कित्येक उमेदवार वैद्यकीय चाचणी दरम्यान गैरहजर राहिले तर काही उमेदवार प्रशिक्षण दरम्यान गैरहजर राहिले आणि काहीजण प्रशिक्षण पूर्ण न करताच सोडून गेले तर काहीजणांनी प्रशिक्षण पूर्ण करुन ही अग्नीशामक पदाची नोकरी न स्वीकारल्याने अग्नीशामकाच्या 101 जागा रिक्त राहिल्या होत्या. या रिक्त जागा भरण्यासाठी गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवार घेण्यासाठी, प्रतीक्षा यादी बनविण्यात आली होती. याच प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी देऊन 101 रिक्त जागा भरण्यात आल्याचे माजी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अशाच रितीने आज अग्नीशामक पदाच्या भरती प्रक्रियेत ज्या 137 रिक्त राहिल्या आहेत, त्या रिक्त जागा भरण्यासाठी गुणवत्ता यादीतील उमेदवारांना घेण्यासाठी, प्रतीक्षा यादी तयार केली जाऊ शकते, असेही काही अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आरोग्य चाचणीत गैरहजर राहिल्याने जी प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली होती, ती यादी गोपनीय होती. तरीही ही यादी माहितीच्या अधिकाराखाली जाहीर झाली. त्यामुळे आता प्रतिक्षा यादी जाहीर करुन रिक्त जागा भरल्या जाऊ शकत नाही. दरम्यान, डॉ. अमित सैनी यांना स्पष्ट केले की, जी गोपनीय प्रतिक्षा यादी माहितीच्या अधिकाराखाली प्रकाशित झाली ती यादी ही आरोग्य चाचणीची होती. तसेच ही आरोग्य चाचणीची यादी सहा महिने न राबविल्याने रद्द झाली होती. त्यांनतर ही प्रतिक्षा यादी माहितीच्या अधिकाराखाली जाहीर झाली होती. त्यामुळे त्याने काहीच नुकसान झाले नाही. तसेच भरती प्रक्रिया पूर्ण राबविण्यात आल्यानंतर अग्नीशामक पदाच्या एकूण 137 जागा रिक्त राहिल्यावर गुणवत्ता यादीतील उमेदवारांना संधी देण्यासाठी प्रतिक्षा यादी ही वर्ष 2015 – 16 च्या भरती प्रक्रिये प्रमाणे प्रसिध्द करुन रिक्त जागा भरल्या जाऊ शकतात. तसेच भरती प्रक्रिया दरम्यान ज्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रतिक्षा यादी प्रसिध्द केली जाते, ती यादी गोपनीय नसते तर ती प्रतिक्षा यादी प्रसिध्द करुन भरती केली जाते. यावर संबंधित प्रकरणाचे कागदपत्रे सादर केल्यावर चर्चा करता येईल, असे अतिरीक्त आयुक्त डॉ. सैनी यांनी राजकारण च्या पत्रकाराशी बोलताना सांगितले.
 
								 
                                 
                         
                            

