नवी दिल्ली :- वन नेशन वन इलेक्शन ही काळाची गरज आहे. निवडणुकांमध्ये गुंतून पडल्याने विकासाला खीळ बसते, त्यामुळे पैसा आणि वेळ दोन्हीचा अपव्यय होतो.. त्यामुळे देशाला पुढे घेऊन जाणाऱ्या प्रत्येक निर्णयाला एनडीएचा घटकपक्ष म्हणून शिवसेना कायम भक्कम पाठींबा देईल अशी भूमिका उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी घेतली. आज दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींसहित भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि सून सौ. वृषाली श्रीकांत शिंदे यादेखील उपस्थित होत्या. यावेळी पंतप्रधानांनी त्यांचे स्वागत करून मिळालेल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने राज्यात केलेल्या कामाच्या बळावर राज्यातील जनतेने ऐतिहासिक जनादेश देऊन महायुतीला विजयी केले असल्याचे सांगितले. मात्र या विजयामुळे आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढली असून नव्या इनिंगमध्ये राज्याला प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याच्या सूचना पंतप्रधान मोदी यांनी शिंदे यांना केली. त्यावर यापुढेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साथीने त्याच जोमाने काम करणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी पंतप्रधान महोदयांना आशवस्त केले.
तसेच त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह लवकरच मोदी यांच्या भेटीसाठी येऊ असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
कल्याणमधील नराधमाला कठोरात कठोर शासन करणार
कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करण्याचे निर्देश दिले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. कल्याण- डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे कालच या पीडितेच्या कुटूंबाला भेटून आले. यावेळी त्यांनी आम्ही सारे आपल्यासोबत असल्याचे सांगून या नराधमावर फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालवून लवकरात लवकर फाशीसारखी कठोर शिक्षा होईल असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रकरणाकडे बारीक लक्ष
शिवसेनेचे अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्यासाठी आलेल्या दोन मारेकऱ्यांना पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या प्रकरणाकडे पक्षाचा प्रमुख म्हणून माझे बारीक लक्ष असून यामागे जो कुणी असेल त्यावर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.