वाढदिवसानिमित्त जमा झाले तब्बल २५ हजारांहून अधिक शैक्षणिक साहित्य
By राजू झनके
मुंबई: विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या आगळ्या-वेगळ्या आवाहनाला समाजाच्या सर्व स्तरांतून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. शुभेच्छा देताना हार, पुष्पगुच्छ, केक वा इतर भेटवस्तू न आणता, गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल यांसारखे शैक्षणिक साहित्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले होते.
या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत तब्बल २५ हजारांहून अधिक शैक्षणिक साहित्य जमा झाल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली.
महिलांवरील अन्याय, अत्याचार, तसेच सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवर अनेक दशकांपासून सातत्याने काम करणाऱ्या डॉ. गोऱ्हे यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल, आदिवासी आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविला.
वाढदिवशी कार्यकर्ते, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, संघटना आणि सामान्य नागरिक यांनी मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक साहित्य अर्पण करून शुभेच्छा दिल्या. यात वह्या, चित्रकला साहित्य, पेन, पेन्सिल, एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके अशा साहित्याचा समावेश होता.
संकलित साहित्य विविध संस्थांच्या माध्यमातून प्रत्यक्ष गरजू विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय डॉ. गोऱ्हे यांनी घेतला आहे. त्यांच्या या उपक्रमाची राज्यभर चर्चा होत असून, “जनतेकडून मिळालेल्या शुभेच्छांचा खरा उपयोग विद्यार्थ्यांच्या भविष्याला उजाळा देण्यात व्हावा,” ही त्यांची भूमिका स्पष्ट दिसून येते.