मुंबई : राज्य शासनातील वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या शुक्रवारी, ४ ऑक्टोबर रोजी तब्बल ५१८७ अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. त्याच दिवशी ५१२२ एमपीएससी उमेदवारांनाही प्रमाणपत्रे देण्यात येणार असून, एका दिवसात तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत दाखल होणार आहेत. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, अशा प्रकारचा हा इतिहासातील कदाचित पहिलाच उपक्रम ठरणार आहे.
शासकीय सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी किंवा मुलाला नोकरी देण्याची तरतूद आहे. मात्र कधी तांत्रिक कारणे, तर कधी प्रशासकीय दिरंगाईमुळे ही नियुक्ती वर्षानुवर्षे प्रलंबित राहत असे. उमेदवारांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागत होती. या संवेदनशील विषयात मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून सामान्य प्रशासन विभागाला तातडीच्या सूचना दिल्या. त्यानंतर झालेल्या सलग बैठकींमधून त्यांनी या प्रक्रियेचा सातत्याने आढावा घेतला आणि अखेर नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणूनच आता ५१८७ उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत.
मुख्य कार्यक्रम ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार असून, त्याला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यांमध्ये नियुक्तीपत्रांचे वितरण करतील. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरू केलेल्या १०० दिवस आणि १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमाचा हाही एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
याचबरोबर, एमपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत यशस्वी झालेल्या लिपिक-टायपिस्ट श्रेणीतील ५१२२ उमेदवारांनाही नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. या १०,३०९ उमेदवारांपैकी सर्वाधिक ३०७८ कोकण विभागातील, २५९७ विदर्भातील, १७१० मराठवाड्यातील, १६७४ पुणे विभागातील, तर १२५० नाशिक विभागातील उमेदवार आहेत, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.