मुंबई – राज्याच्या राजकारणात आक्रमक, प्रभावी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) हे गेल्या काही महिन्यांत वादग्रस्त कृतींमुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या काही कृत्यांमुळे भाजपची (BJP) प्रतिमा मलिन झाली असून, खुद्द मुख्यमंत्री फडणवीस नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी, फडणवीस यांनी धनगर समाजाला (Dhangar Community) नवा पर्याय म्हणून अँड. चिंतामण (चिमणराव) डांगे यांच्यावर विश्वास दाखवल्याचे बोलले जात आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) पडळकर समर्थकांनी विधानभवनाच्या लॉबीमध्ये केलेला गोंधळ आणि प्रतिपक्षाच्या आमदाराच्या समर्थकांवर केलेली मारहाण हा प्रचंड वादाचा विषय ठरला. विरोधकांनी सभागृहात गदारोळ करून मुख्यमंत्री फडणवीस यांना अडचणीत आणले. अखेरीस, फडणवीस यांच्या कठोर शब्दांनंतर पडळकरांना सभागृहात माफी मागावी लागली.
या प्रकारामुळे केवळ पडळकरच नव्हे तर भाजपचीही राज्यभर नाचक्की झाली. त्यानंतर फडणवीस यांनी “आमदार माजलेत” अशी संतप्त प्रतिक्रिया देताना अप्रत्यक्षपणे पडळकरांनाच लक्ष्य केले होते.
भाजपच्या बॅनरखाली पडळकरांनी केलेल्या आंदोलने, मोर्चांमुळेही अनेकदा दंगली उसळल्या. याचा ठपका विरोधकांनी थेट भाजप व फडणवीसांवर ठेवला. त्यामुळे फडणवीस धनगर समाजात नवा पर्याय शोधण्याच्या तयारीला लागले.
दरम्यान, शरद पवार यांचे विश्वासू सहकारी असलेले अण्णा डांगे (Anna Dange) यांनी आपल्या मुलांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर फडणवीस यांच्या नजरेत पडळकरांना पर्याय म्हणून अँड. चिंतामण डांगे (Adv Chintaman Dange) पुढे आले. डांगे कुटुंब भाजपसाठी नवे नाही.
डांगे यांच्या मागे शैक्षणिक संस्था, सूतगिरणी, स्थानिक जनाधार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे धनगर समाजाची मतपेढी हा भक्कम आधार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) असतानाही जयंत पाटील यांनी त्यांना संधी दिली होती. आता भाजपमध्ये प्रवेश केल्याने धनगर समाजाचा कल भाजपकडे आणखी मजबूत होईल, हे स्पष्ट झाले आहे.