धुळे – धुळे शहरात यंदाच्या गणेश विसर्जनात आवाजाची भिंत (डीजे) आणि लेझर लाइटिंग या प्रतिबंधित घटकांशिवाय झालेली मिरवणूक राज्यभरात आदर्श ठरली. मात्र विसर्जनानंतर उघड्यावर पडलेल्या गणेश मूर्तींच्या सुरक्षित विसर्जनाचा नवा प्रयोग – “मूर्ती विसर्जनाचा धिवरे पॅटर्न” – आता चर्चेत आहे.
धुळे शहर संवेदनशील असल्याने येथे पोलीस प्रशासनाला नेहमीच विशेष दक्षता घ्यावी लागते. यंदा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत डीजे आणि लेझर लाइटिंगवर बंदी घालण्यासाठी व्यापाऱ्यांसोबत बैठका घेऊन जनजागृती केली. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतेकांनी पारंपरिक ढोल-ताशा, भजन-कीर्तन, धार्मिक गाणी आणि समाजोपयोगी संदेश यांच्याद्वारे विसर्जन मिरवणुकीत उत्साह वाढविला. परिणामी मिरवणुका उशिरापर्यंत चालूनही वातावरण शांत आणि सुरळीत राहिले.
मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी धिवरे स्वतः महापालिकेच्या विसर्जन स्थळांची पाहणी करत असताना त्यांना पांझरा नदीच्या काठावर अनेक गणेश मूर्ती उघड्यावर पडलेल्या दिसल्या. रात्री पाण्याची पातळी कमी झाल्याने मूर्ती पुन्हा बाहेर आल्याचे त्यांच्या लक्षात आले. तत्काळ त्यांनी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना निर्देश दिले. महिला आणि पुरुष कर्मचारी धिवरे यांच्या पुढाकाराला प्रतिसाद देत मोहिमेत सामील झाले आणि उघड्यावर आलेल्या शेकडो मूर्ती जमा करण्यात आल्या.
या सर्व मूर्ती एका खासगी वाहनातून पांझरा नदीतील हत्ती डोह येथे नेण्यात आल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः अधिकाऱ्यांसह उपस्थित राहून भक्तिभावाने या सर्व मूर्तींचे सुरक्षित विसर्जन केले.
यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर लाइटिंगशिवाय उत्साहात झालेल्या मिरवणुका आणि उघड्यावर पडलेल्या मूर्तींचे सुरक्षित विसर्जन – हा अभिनव प्रयोग धुळेकरांसाठी आता “मूर्ती विसर्जनाचा धिवरे पॅटर्न” म्हणून ऐतिहासिक ठरत आहे.