धुळे: पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या राज्यस्तरीय मूल्यमापनात धुळे विभागाने आपले स्थान भक्कम करत दुसरा क्रमांक पटकावला आहे. अपर पोलीस महासंचालक (दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी घेतलेल्या या मूल्यांकनात तांत्रिक कार्यक्षमतेचा, नविन तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराचा आणि प्रशासकीय सुसूत्रतेचा उच्च दर्जाचा मान मिळाला आहे.

पश्चिम विभाग, पुणे अंतर्गत 28 युनिट्सच्या मूल्यमापनात धुळे पोलीस विभागाने खालील उल्लेखनीय कामगिरी केली:
1. निवडणूक बंदोबस्तासाठी तांत्रिक साहित्य खरेदी: लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर RF Coaxial केबल्स, चार्जर्स, DFMD, HHMD यासारखे अत्याधुनिक साहित्य खरेदी करण्यात आले.
2. शॅडो बुथसची तांत्रिक पुनर्रचना: 91 शॅडो बुथ्सची संख्या कमी करून ती 66 वर आणण्यात आली. पुडाशी, जुनावणे व पळासनेर येथे तात्पुरत्या स्वरूपात रिपीटर्स उभारून संपूर्ण जिल्ह्यात कार्यक्षम बिनतारी दळणवळण यंत्रणा कार्यान्वित केली.
3. धुळे शहरासाठी इंडस टॉवरवर वॉकी टॉकी व्यवस्था: इंडस टॉवर, मोहाडी येथे 90 मीटर टॉवरवर एरियल उभारणी व वातानुकूलित साहित्यसाठी जागा प्राप्त करून वॉकी टॉकी संप्रेषण व्यवस्था प्रभावी केली.
4. साक्रीसाठी ATC टॉवरवर संप्रेषण उभारणी: साक्री परिसरातील वाढती गरज लक्षात घेऊन ATC टॉवरवर 80 मीटर टॉवर व वातानुकूलित यंत्रणा स्थापण्यात आली.
5. CSR निधीतून वीज बॅकअप: ISTPL कंपनीच्या CSR फंडातून मंथन हॉलसाठी 5 KVA/12V 200AH विजेरी सह 8-10 तासांचा बॅकअप उपलब्ध करून दिला.
6. युवा कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षकांची नियुक्ती: मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजनेतून 11 प्रशिक्षणार्थींना तांत्रिक प्रशिक्षण देऊन निवडणूक व दैनंदिन कामकाजात यशस्वी वापर केला गेला.
7. 5G इंटरफरन्स समस्येवर उपाय: पोलनेट फेज 2 यंत्रणा 5G इंटरफरन्समुळे बंद होती. 5G बॅण्ड पास फिल्टर यशस्वीरीत्या बसवून संप्रेषण पुन्हा सुरळीत करण्यात आले.
8. भांडार रूमचे पुनर्रचना काम: जुन्या भिजलेल्या भांडार रूमच्या बदल्यात नवीन योग्य ठिकाणी साहित्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यात आले.
9. फ्रिक्वेन्सी व प्रोग्रामिंग मध्ये सुधारणा: वॉकी टॉकीसाठी फ्रिक्वेन्सी प्लॅनिंग, ID प्रोग्रामिंग व व्हॉटेज सेटिंग यांसह बिनतारी संप्रेषण यंत्रणेत एकसंधता निर्माण केली गेली.
या सर्व उपक्रमांमुळे धुळे जिल्ह्याने राज्यभरात दुसरा क्रमांक पटकावत इतर जिल्ह्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. यामध्ये पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे विशेष योगदान असून त्यांच्या दूरदृष्टीने व मार्गदर्शनाने ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाली आहे.