X : @MasoleSantosh
धुळे – बाल लैंगिक अत्याचारासह अन्य घटनांच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडवर आले आहेत. श्रीकांत धिवरे (Dhule SP Shrikant Dhivare) यांनी यासाठी सगळ्याच पोलीस ठाण्यात पोलीस दादा आणि पोलीस दीदीची (Police Dada – Police Didi) नेमणूक करण्याचे आदेश दिलेच, पण शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीच्या (security of students) यंत्रणा उभारण्याचे कटाक्षाने पालन करण्याच्या सूचना दिल्या. शाळांसमोर थांबणारे टवाळखोर हेही आता पोलिसांचे लक्ष्य असणार आहेत.
अधीक्षक धिवरे यांच्या आदेशानुसार पोलीस अधिकाऱ्यांनी जवळपास सर्वच शाळांना भेटी देऊन बाल विद्यार्थ्यांसह, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि आवश्यक त्या उपाय योजना करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. या अनुषंगाने पोलीस दादा आणि पोलीस दीदीची नेमणूक करण्यात आली आहे.
यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गेल्या आठवड्यात पोलिसांनी सर्व शाळेमध्ये भेटी दिल्या आणि लहान मुलांच्या सुरक्षे विषयी संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह संपूर्ण यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या. यात प्रामुख्याने सीसीटीव्ही (CCtV), तक्रार पेटी (Complaint Box), संरक्षक भिंत, चारित्र्य पडताळणी विषयी गांभीर्य बाळगण्याची जाणीव यावेळी करून देण्यात आली. सर्व पोलिस ठाण्यात आता पोलिस दादा आणि पोलिस दीदी यांची नेमणूक करुन त्यांना अशासकीय संस्थे (NGO) मार्फत प्रशिक्षण देण्यात आले.
शाळकरी विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतूकीवरही (illegal transport of students by school van) पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून काही ठिकाणी कारवाई केली. रिक्षाच्या क्षमतेपेक्षा अधिक संख्येने शालेय विद्यार्थ्यांना बसवून त्यांची वाहतूक करतांना पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली. शाळेसमोर नाहक थांबणारे टवाळखोरही आता पोलिसांच्या रडारवर असून शाळांच्या आसपासच्या पान दुकानदारांकडे तपासणी करण्यात आली. यावेळी प्रतिबंध असलेले पदार्थ जप्त करून कारवाई करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शाळेसमोर धूमस्टाईल मोटार सायकल चालविणारे आणि खास करून बुलेट चालवणाऱ्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे स्वतः वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन सुरक्षेसंदर्भात तपासणी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे शाळा व्यवस्थापन, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी पोलीस अधिक्षक धिवरे यांनी बाल विद्यार्थ्यांच्या सुरक्षे संदर्भात घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले.