मुंबई: मुंबईतील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ कॉलेज, बुद्ध भवन येथील ग्रंथालयाला आज विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी ग्रंथालयातील मौल्यवान साहित्याचा आढावा घेतला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेचे डिजिटलायझेशन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
या ग्रंथालयात एक लाखांहून अधिक ग्रंथ आणि दुर्मिळ पुस्तके जतन केलेली आहेत. उपाध्यक्ष बनसोडे म्हणाले, “ही केवळ पारंपरिक ग्रंथसंपदा न राहता, डिजिटल माध्यमातून ती नवीन पिढ्यांसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यामुळे हे ग्रंथालय आधुनिक वाचनकेंद्र म्हणून उदयास येईल.”
त्यांनी पुढे सांगितले की, या उपक्रमाचा अभ्यास, संशोधन आणि डिजिटल शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल.
राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या इमारतींना जतन करण्यासाठी केलेल्या आर्थिक तरतुदीचे अण्णा बनसोडे यांनी कौतुक केले.
त्यांनी म्हटले की,
“या ऐतिहासिक वास्तूंबरोबरच बाबासाहेबांच्या विचारांचा आणि लेखनाचा वारसा जपणे ही काळाची गरज आहे. हा वारसा टिकवण्यासाठी सरकारकडेही पाठपुरावा करू.”

या ग्रंथालयात डॉ. आंबेडकर लिखित संविधानाची पहिली प्रत, ‘बुद्ध आणि धम्म’ या ग्रंथाच्या लिखाणापूर्वीचे कच्चे हस्तलिखित, तसेच त्यांनी १९३४ साली स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली ‘स्वातंत्र्य’ या शब्दाची नोटबुकही जतन करण्यात आली आहे. तसेच, डॉ. आंबेडकर यांच्यावर प्रभाव टाकणारे तत्त्वज्ञ जॉन ड्यूई यांच्या ग्रंथांचाही समावेश येथे आहे.
या भेटीदरम्यान उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी प्राचार्य प्रा. डॉ. अशोक सुनतकरी, उपप्राचार्य प्रा. रमेश झाडे, मुख्याध्यापक प्रा. विजय मोहिते आणि संग्रालय अधिकारी चैताली शिंदे यांच्याकडून ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथांविषयी सविस्तर माहिती घेतली. त्यांनी भविष्यात या मौल्यवान वारशाचे संवर्धन आणि डिजिटलायझेशनसाठी शासनाकडे आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.