यवतमाळ : यंदाच्या ओला दुष्काळ आणि नापिकीमुळे गंभीर समस्यांना सामोरे जात असलेल्या आदिवासी व शेतकरी कुटुंबांना दिवाळीच्या काळात उपासमार होऊ नये, यासाठी पांढरकवड्यातील समाजसेवक किसनराव बोरेले यांच्या पुढाकाराने आणि लंडनस्थित रोहित शेलटकर यांच्या ग्रँड मराठा फाउंडेशनच्या सहकार्याने १० हजार दुष्काळग्रस्त कुटुंबांना दिवाळी भेट किटचे वितरण करण्यात आले. झरीजामणी, आंबेझरी, मारेगाव, सोन कोलाम पोड, वसंतनगर तांडा, खैरगाव देशमुख, नांदगाव आणि वांजरी कोलाम पोड अशा दुर्गम आदिवासी भागात २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान प्रत्येकी सुमारे ₹६०० किमतीचे अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. उपासमारीच्या सावटाखालील अनेक कुटुंबांच्या डोळ्यात या मदतीमुळे अश्रू दाटून आले.
याशिवाय भाईबीजच्या निमित्ताने पांढरकवड्यातील १० हजार गरजू बहिणींना पीयू लेदर बॅगचे वितरण करण्यात आले. “आपला भाऊ किशोर भाऊ” या उपक्रमाचे आयोजक अंकित नैताम यांच्या संकल्पनेला दानशूर किसन बोरेले यांनी साथ देत २६ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दिवाळीच्या आनंदात भर पडली. दोन वर्षांपूर्वी या उपक्रमाअंतर्गत १० हजार बहिणींना पैठणी साडी देऊन ओवाळणी करण्यात आली होती.

प्रसिद्धीपासून दूर राहून शांतपणे समाजसेवा करणारे नाव म्हणजे किसनराव बोरेले. विपश्यना साधक असलेल्या बोरेले यांनी आर्णी तालुक्यातील उमरी पठार येथील डोंगरे बाबा वृद्धाश्रमासाठी सुमारे ₹५० लाख खर्च करून दोन हॉल आणि एक एकर कंपाउंड बांधून दिले. कोरोना काळात त्यांनी कोणतीही प्रसिद्धी न घेता लाखो रुपयांच्या मदत किट दिल्या. केळापूर तालुक्यातील कोपामांडवी येथील शेतकरी विधवा गीता चिंचोळकर यांच्या मुलीच्या विवाहासाठीही त्यांनी ₹५१ हजार रुपये कन्यादान दिले, तेही नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर. यंदाच्या दिवाळीतही त्यांनी एकाही पोडातील कुटुंब उपाशी राहू नये, अशी भूमिका घेत मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत दिल्याचे समाजसेवक किशोर तिवारी यांनी सांगितले.
किशोर तिवारी यांनी म्हटले की, काही नेते दररोज प्रसिद्धीसाठी धडपडतात, तर दुसरीकडे किसन बोरेले यांसारखे व्यक्ती शांतपणे, विनायश, आपल्या संपत्तीचा मोठा भाग समाजसेवेसाठी खर्च करतात. अशा कार्यातून समाजातील इतरांनी प्रेरणा घ्यावी, असा संदेश त्यांनी दिला.

