मुंबई : मुंबई उपनगरातील रस्त्यांची पाहणी मुंबई उपनगर पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आजपासून तिसऱ्यांदा सुरू केली असून, या पश्चिम उपनगरातील पाहणी दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणच्या अपूर्ण रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, २० मे नंतर कोणतेही नवीन सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू करू नये, 31 मे पर्यंत रस्ते वाहतूक योग्य करा, असे स्पष्ट निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना दिले.
आज रस्ते पाहणीच्या या दौऱ्यादरम्यान वांद्रे पश्चिम येथील १४ व्या रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून, रस्ता पूर्णपणे खोदून ठेवलेला असल्याचे निदर्शनास आले. कांदिवली येथील न्यू लिंक रोड आणि डहाणूकरवाडी मेट्रो स्टेशन परिसरातील रस्त्यांचे अपूर्ण काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिले.
मालाड पूर्व येथील गोविंदभाई श्रॉफ रोड ते एस. व्ही. रोडपर्यंतच्या रस्त्यांच्या क्यूरींगचे काम पूर्ण झाले असून, हा रस्ता काही दिवसांत वाहतुकीसाठी खुला होईल असेही त्यांनी सांगितले. दहिसर पश्चिम येथील रंगनाथ केसकर महामार्ग आणि रिव्हर व्हॅली रोडला जोडणाऱ्या दहिसर नदीवरील पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी आमदार मा. मनिषा चौधरी यांनी दहिसर परिसरातील अपूर्ण कामांची यादी अधिकाऱ्यांसमोर सादर केली.
यावेळी मंत्री शेलार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, येत्या तीन वर्षात मुंबईत उत्तम रस्त्यांची सोय नागरिकांसाठी केली जाईल, यावरून उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मुंबईतील रस्त्यांची जी दयनीय स्थिती होती, त्याच्या तुलनेत फक्त एका वर्षात आम्ही ६० टक्क्यांहून अधिक रस्त्यांची सुधारणा पूर्ण केली आहे असेही मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले.
रस्त्यांच्या दुरुस्ती व विकासाच्या कामावर आमचा सतत पाठपुरावा सुरू असून मंत्री अॅड. आशिष शेलार यांचा हा पावसाळ्यापूर्वी रस्ते पाहणीचा तिसरा दौरा आहे, आता नवीन रस्ता खोदू नका, 20 मे नंतर काँक्रीटीकरण करणे थांबा, कारण पावसाळ्याच्या तोंडावर केलेली तात्पुरत्या कामांमुळे रस्ते पुन्हा उखडण्याचा धोका असतो. ३१ मे २०२५ पर्यंत सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करा, जे रस्ते खोदून ठेवले आहेत, त्याचे डांबरीकरण करुन ते वाहतूकीस खूले होतील असे करा, डांबरीकरण करताना ते रस्ते पावसाळ्यात उखडून खड्डे पडणार नाहीत याची काळजी घ्या, तसेच सध्या लावण्यात आलेले दुभाजक हटवा, डेब्रिज, खडी, माती तातडीने हटवण्यात यावेत, गटारांमध्ये गेले डेब्रिज आणि मातीही काढा, अशा सूचना यावेळी मंत्री शेलार यांनी दिल्या.