कला गुरुवर्य दत्ता परुळेकर यांच्या साक्षीने त्यांनीच स्थापन केलेल्या बांद्रा स्कूल ऑफ आर्ट, जे आता रहेजा स्कूल ऑफ आर्ट नावाने ओळखले जाते. त्या कॉलेजातून कला शिक्षणाची उच्च पदवी घेऊन बाहेर पडलेल्या सुमारे दीडशे माजी कलावंतानी 25 जुलै 2010 रोजी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुच्या साक्षीने “आर्टबँड” नावाची दृश्यकला माध्यमातून सामाजिक सेवा करणारी संस्था स्थापन केली.
कलावंताने केवळ आपल्या कलेतच दंग न राहाता आपल्या कला कल्पना द्वारे काही समाज हिताच्या गोष्टी घडवून समाजातील तळागाळातील कलागुणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षित तसेच अशिक्षित नागरिकांसाठी कलेद्वारे सुसंस्कृत घडविण्याचे ध्येय बाळगले पाहिजे हे आमच्या कलागुरूंचे आवाहन…. हाता बोटात कलेचे वरदान लाभूनही दारिद्र्य आणि नियतीच्या दुष्ट फेऱ्यात अडकलेल्या गुणवंत भावी कलाकारांचे भविष्य उज्वल करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहून उत्तम भारतीय नागरिक म्हणून पुढे यायला पाहिजे, अशी त्यांची तीव्र इच्छा!
याच इच्छापुर्ततेस गेली तेरा चौदा वर्षे आम्ही जरी साठी सत्तरी पार केली असली तरी तितक्याच जोमाने कार्यरत आहोत. त्यांच्या दहिसर पश्चिम येथील निवासस्थानी ज्यांना त्यांचा अधिकाधिक सहवास मिळाला असे सन 1980 सालच्या बॅचचे आणि आजूबाजूच्या सालचे काही विद्यार्थी त्यांच्या घरी जाऊन आपल्या यश किर्तीचे कथन करीत. यशापयश ऐकून त्यांना त्याचे मनोमन कौतुक असले तरी त्यांच्या मस्तकावरची चिंताग्रस्त एक रेघ कायमची उमटलेली दिसायची ती चिंता म्हणजे कलावंत सामान्य जनतेपर्यंत आपल्या कला माध्यमातून पोहोचतो का? त्यांच्याशी हितगुज करतो का? आपल्या कलेची नाळ त्यांच्याशी जुळवतो का? त्यांची हीच चिंता दूर करण्यासाठी आम्हीसतत प्रयत्नशील आहोत. कधी यश येते कधी अपयश! पण उमेद सोडलेली नाही.
कधी अपंग कधी गतीमंद कधी दुर्गम आदिवासी भागातील कलागुणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून आमची संस्था अशांना कलानंद देऊन त्यांच्यात नवीन उमेद निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने करत असते. मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, उपनगरातील प्रबोधनकार नाट्यगृह आर्ट गॅलरी सारख्या ठिकाणी कला प्रदर्शने प्रात्यक्षिके, कलागुणी विद्यार्थ्यांचा गुण गौरव असे उपक्रम करून उद्दिष्ट साध्य करीत असते. कला प्रदर्शनातून निधी उभारण्याचा प्रयत्नही केला जातो. कला रसिकांना यावेळीही कलानंद देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आगामी 17 डिसेंबर ते 23 डिसेंबर 24 रोजी पर्यंत जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये होणाऱ्या कला प्रदर्शनाच्या निमित्ताने “घरोघरी कलाकृती” अशी आमची संकल्पना आहे.
अत्यल्प मोबदल्यात कला रसिकांनी कलाकारांच्या कलाकृती खरेदी करून आपलं घरही सजवावं सर्वांना आनंद द्यावा शिवाय दिलेल्या मोबदल्यात आर्टबँड चे उद्दिष्ट सफल करताना ग्राहकाला समाजसेवेचीही संधी मिळेल. कलावंत हा समाजाचा घटक आहे, तो समाजापासून अलिप्त नाही. तो आहे म्हणून समाज आनंदी आहे, रसिक आहे म्हणून कलावंत जिवंत आहे ही एकमेकांची नाळ कायम जुळलेली राहिलीपाहिजे हाच त्या मागचा उदात्त हेतू!
आपली क्षमा मागून असं म्हणेन, प्रत्यक्ष कलाकृती विकत घेण्याची मानसिकता अजून भारतीय संस्कृतीत अपेक्षे एवढी रुजलेली नाही. साहित्य कलाकृती, दृश्य कलाकृती साठी खर्च करण्याची मानसिकता भारतीयांमध्ये कमकुवतच दिसते. ती रुजवण्यासाठी कलावंतांकडूनही प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे. रसिकालाही कलाकृती खरीदण्याचा मोह होण्यासारखी अनुकूल परिस्थिती कलावंताने निर्माण करणे आवश्यक आहे.
असा प्रयत्न आपल्या आर्ट बॅण्डच्या माध्यमातूनच व्हावा असा आमच्या कला गुरूंचा आम्हा कलावंतांना जणू आग्रहच होता.
म्हणूनच आपणास नम्र विनंती आहे की ..
रसिक हो!
साद द्या प्रतिसाद द्या !
आम्हा नवी उमेद द्या!
धन्यवाद!
मनोगत. दिगंबर चिंचकर