महाड – महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण खात्याकडून उभारण्यात आलेले आणि तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते १० ऑगस्ट २००४ रोजी लोकार्पित झालेले महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (नाट्यगृह) येत्या १ जानेवारीपासून नूतनीकरणासाठी बंद राहणार आहे. ही माहिती स्मारकाचे व्यवस्थापक प्रकाश जमदाडे यांनी दिली.
२०२१ च्या जुलै महिन्यात आलेल्या महापुरानंतर या स्मारकातील काही यंत्रणा तात्पुरत्या दुरुस्त करण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांत ती पुन्हा नादुरुस्त झाल्याने समाजकल्याण खात्याने स्थानिक व्यवस्थापनाचा प्रस्ताव मंजूर करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नूतनीकरणाची जबाबदारी सोपवली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुमारे ₹३.२५ कोटींच्या खर्चात खालील कामे केली जाणार आहेत: नाट्यगृहातील पत्रे, पडदे आणि खुर्च्या पूर्णपणे बदलणे, सेंट्रल एसी (वातानुकूलन) यंत्रणा नव्याने बसविणे, पीओपी आणि डेकॉर नव्याने करणे,प्रकाश आणि ध्वनी यंत्रणा आधुनिक स्वरूपात बसविणे, ड्रेसिंग रूम व लाईट कंट्रोल रूमचे आधुनिकीकरण, प्रेक्षकांसाठी लाईट योजना नव्याने उभारणे
या सर्व कामांमुळे नाट्यगृहाचे संपूर्ण रूपांतर आधुनिक सुविधांसह होणार आहे.
दीर्घकाळ बंद पडलेली ब्लोअर डक्ट एसी प्रणाली पूर्णपणे बदलून नव्याने उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी कार्यक्रम पाहण्यासाठी येणाऱ्या रसिकांना आता उष्णतेचा त्रास होणार नाही, असे व्यवस्थापक प्रकाश जमदाडे यांनी सांगितले.
२००४ मध्ये उभारलेल्या या स्मारकात गेल्या दोन दशकांत अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन झाले आहे. सध्या या स्मारकाचे नियंत्रण समाजकल्याण खात्याच्या बार्टी संस्थेकडे (BARTI) आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित विविध कार्यक्रम, नाट्यप्रयोग आणि चर्चासत्रे या स्मारकात नियमितपणे आयोजित केली जातात.
महाड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीत पार पडणार असल्याने, या नाट्यगृहात निवडणूक प्रक्रियेतील काही कार्यक्रमांचे आयोजन होणार का, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
महाडकर नागरिकांचे म्हणणे आहे की, नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर या नाट्यगृहात पुन्हा एकदा नव्या झळाळीने कार्यक्रम होऊ लागतील. मात्र, मागील ठेकेदारालाच पुन्हा काम देण्यात आले तर गुणवत्तेचा बट्ट्याबोळ होईल, अशी भीती काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.