मुंबई: सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठान व सहयोग संस्था वसई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचवे समाज साहित्य भाषा विचार संमेलन यंदा वसई येथे नोव्हेंबर–डिसेंबर महिन्यात होणार असून, या संमेलनाच्या अध्यक्षपदी भाषा अभ्यासक डॉ. दीपक पवार यांची निवड करण्यात आली आहे.
या वर्षीच्या ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी सायमन मार्टिन यांच्या संयोजनाखाली हे संमेलन होणार आहे.
डॉ. पवार हे गेल्या २४ वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत असून महाराष्ट्रातील मातृभाषा चळवळीचे महत्त्वाचे नाव मानले जाते. “आपण कोणत्याही भाषेचे शत्रू नसतो, मात्र आपली मातृभाषा आपणच जपायला हवी आणि तिच्या माध्यमातूनच शिक्षण व दैनंदिन व्यवहार व्हायला हवा,” असा त्यांचा ठाम आग्रह आहे. याच भावनेतून ते भाषिक जनजागृतीसाठी सातत्याने कार्यरत आहेत.
ज्येष्ठ इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर आणि कथाकार-नाटककार जयंत पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही चळवळ सुरू करण्यात आली असून, समाज, साहित्य, भाषा आणि विचार या परस्परपूरक संकल्पनांच्या केंद्रस्थानी ठेवून दरवर्षी संमेलनाचे आयोजन केले जाते. याआधीची चार संमेलने सिंधुदुर्ग आणि मुंबई येथे झाली असून, विविध भागातील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि भाषाशास्त्रज्ञ यांना जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
संस्थापक अजय कांडर, अध्यक्ष मधुकर मातोंडकर, मुख्य कार्यवाह सुरेश बिले, कोषाध्यक्षा प्रमिता तांबे, तसेच विश्वस्त व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या ऑनलाइन बैठकीत एकमताने डॉ. पवार यांच्या अध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली.