मुंबई: राज्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट केले. यासाठी महायुतीचे सर्व मंत्री पूरग्रस्त भागांचा दौरा करून शेतकऱ्यांचे नुकसान प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.
शिंदे म्हणाले, “मी स्वतः धाराशिव जिल्ह्याला भेट देऊन भूम, परांडा आणि कळंब तालुक्यांची पाहणी करणार आहे. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत हा दौरा होईल. राज्यातील प्रत्येक मंत्र्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.”
उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याचे ठरले असून जमिनींचे पंचनामे जलदगतीने पूर्ण करणे, जनावरांच्या नुकसानीची भरपाई करणे आणि आरोग्य विभागाकडून साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी उपाययोजना करणे निश्चित करण्यात आले आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर स्वतः मराठवाड्याचा दौरा करणार आहेत.

शिवसेनेतर्फे मदतकार्याला सुरुवात
मराठवाड्यातील आपत्तीग्रस्तांना मदतीसाठी शिवसेनेच्या वतीने ५० ते ६० ट्रक तातडीने रवाना करण्यात येणार आहेत. मुंबईतील बाळासाहेब भवन येथून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून पहिला ट्रक रवाना करण्यात आला.
या ट्रकमध्ये जीवनावश्यक वस्तू, औषधे, डॉक्टरांचे पथक आणि घरगुती गरजांसाठी लागणाऱ्या किट्स यांचा समावेश आहे. शिंदे म्हणाले, “ही मदत केवळ राजकारणासाठी नाही तर शेतकऱ्यांच्या उभारीसाठी आहे. संकटात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच खरी शिवसेना आहे.”