५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला मतमोजणी
मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठा निर्णय घेत राज्य निवडणूक आयोगाने अखेर १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीनुसार या निवडणुका घेतल्या जाणार असून ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणात ज्या जिल्हा परिषदांनी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली नाही, अशाच जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणुका घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाने १२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत निवडणुका घेण्यास मुदतवाढ दिली होती. मात्र, निवडणुका नेमक्या कधी घ्याव्यात याबाबत कोणतेही ठोस निर्देश दिले नव्हते. अखेर आज आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
पहिल्या टप्प्यातील जिल्हे
पहिल्या टप्प्यात खालील १२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका होणार आहेत –
कोकण विभाग:
• रायगड
• रत्नागिरी
• सिंधुदुर्ग
पश्चिम महाराष्ट्र:
• पुणे
• सातारा
• सांगली
• कोल्हापूर
• सोलापूर
मराठवाडा:
• छत्रपती संभाजीनगर
• परभणी
• धाराशिव
• लातूर
निवडणूक कार्यक्रम
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
• १ जुलै २०२५ – मतदार यादी ग्राह्य
• १६ ते २१ जानेवारी २०२६ – उमेदवारी अर्ज दाखल
• २२ जानेवारी – अर्जांची छाननी
• २७ जानेवारी – अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
• २७ जानेवारी – उमेदवारांना चिन्ह वाटप
• ५ फेब्रुवारी २०२६ – मतदान
- वेळ: सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०• ७ फेब्रुवारी २०२६ – मतमोजणी
जिल्हानिहाय पंचायत समित्यांची संख्या
या १२ जिल्ह्यांमध्ये एकूण १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार असून जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे –
• रायगड – १५
• रत्नागिरी – ९
• सिंधुदुर्ग – ८
• पुणे – १३
• सातारा – ११
• सांगली – १०
• सोलापूर – ११
• कोल्हापूर – ११
• छत्रपती संभाजीनगर – ९
• परभणी – ९
• धाराशिव – ८
• लातूर – १०
राज्यातील ग्रामीण राजकारणासाठी या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असून, सर्वच प्रमुख पक्षांनी तयारी सुरू केली आहे. आगामी काळात उमेदवारांच्या याद्या आणि प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.

