मुंबई – राज्यात महायुतीची सत्ता असली—भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस—तरीही आगामी २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजप स्थानिक पातळीवर स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. विशेषतः, मीरा-भाईंदर महानगरपालिका ही भाजपच्या गोटात स्वबळाचा नारा अधिक ठळकपणे घुमत आहे.
भाजपचे वजनदार नेते आमदार नरेंद्र मेहता यांनी मीरा-भाईंदर मनपेत शिंदे यांच्या शिवसेनेसोबत कोणतीही युती नको, असा स्पष्ट प्रस्ताव मांडला आहे. प्रताप सरनाईक यांनी गेल्या काही महिन्यांत या क्षेत्रात प्रभाव वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना उत्तर म्हणून मेहतांनी हा ठाम पवित्रा घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही छुपे समर्थन मेहतांना लाभत असल्याची चर्चा भाजपच्या विश्वसनीय सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली.
मीरा-भाईंदरमध्ये अनेक वर्षांपासून भाजपचा मजबूत गड आहे. गुजरात, मारवाडी, जैन, पटेल तसेच उत्तर भारतीय समाजाचे सातत्याने मिळणारे प्रचंड पाठबळ ही भाजपची सर्वात मोठी ताकद आहे. २०१७ मधील चार सदस्यीय प्रणाली लागू झाल्यानंतर भाजपने एकहाती ६१ नगरसेवक निवडून आणत सत्ता कायम ठेवली होती.
याउलट, शिंदे गटातील शिवसेनेचे १७ नगरसेवक—पूर्वीच्या शिवसेनेतून फुटलेले काही आणि भाजप-काँग्रेसमधून आलेले काही—आजही संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत असल्याचे स्पष्ट दिसते. या भागात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अस्तित्व आजही जाणवते, हेही वास्तव आहे. यामुळे मेहतांचे गणित सोपे आहे:
शिंदे गटाने युती करायची असल्यास मूळ त्यांच्या १७ जागाच द्याव्यात, उर्वरित १३ जागा मैत्रीत वाटून घेऊ, अन्यथा भाजप स्वबळावरच लढेल असा प्रस्ताव मेहता यांनी मांडला आहे.
प्रताप सरनाईक यांनी या प्रश्नावर मौन बाळगले असून, “जागावाटपाची चर्चा मुख्य नेते करतील,” असे त्यांनी सांगितले. मात्र, मेहतांचा “स्वबळाचा” नारा उघडपणे चालूच आहे, ज्यामुळे शिंदे गोटात अस्वस्थता वाढली आहे.
याच धर्तीवर कल्याण–डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र देखील भाजपसाठी तितकेच महत्त्वाचे. हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि रणनितीकार आमदार रविंद्र चव्हाण यांचे होमपीच. परंतु इथेही तणाव तीव्रच आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी चव्हाण यांचे अनेक समर्थक फोडून त्यांना शिवसेनेत घेतल्यामुळे चव्हाण प्रचंड नाराज आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून चव्हाण यांनी नाराज शिंदे कार्यकर्त्यांना भाजपात दाखल करण्याचा मोठा उपक्रम चालवला आहे. त्यामुळे आज या मनपेत भाजप शिंदे गटापेक्षा वरचढ ठरला आहे.
चव्हाण यांनी येथेही युतीला नकार देत स्पष्टपणे “स्वबळाचा नारा” दिल्याने एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
शिंदे यांचा पुढील काळ कठीण असल्याची चर्चा आहे. प्रदेशातील भाजप नेते पद्धतशीर आखणी करत असल्याचे संकेत आहेत.
महापालिका निवडणुका जवळ येत असताना मीरा-भाईंदर आणि कल्याण-डोंबिवली—ही दोन्ही महापालिका शिंदे गटासाठी राजकीय कसोटी ठरणार आहेत.
सूत्रांचे म्हणणे आहे की, भाजपचे स्थानिक नेते महायुतीपेक्षा स्वबळाकडे झुकत आहेत, फडणवीसही स्थानिक नेत्यांच्या मागण्यांना पाठबळ देत असल्याचा अंदाज आहे. युती तुटल्यास थेट तोटा शिंदे गटाला होऊ शकतो. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही पद्धतशीरपणे शिंदे गटाला अडचणीत आणणारी चलाख रणनीती आखली आहे.
शेवटी सूत्रांचा ठाम दावा आहे की, “आगामी निवडणुकांमध्ये अनेक मनपांत भाजप स्वबळावर जाणार असून, हा काळ एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे भविष्य ठरवणारा ठरेल. आता फक्त… ‘वेट अँड वॉच!’”

