मुंबई/पालघर: मंत्रालयात आमदारांसाठी स्वतंत्र “आमदार कक्ष” स्थापन करून संगणक, प्रिंटर व इतर आवश्यक कार्यालयीन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आमदार विलास तरे यांनी मुख्यमंत्री तथा सामान्य प्रशासन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार तरे म्हणाले की, राज्यात २८८ आमदार व ७८ विधानपरिषद सदस्य अशा एकूण ३६६ लोकप्रतिनिधींना विविध प्रश्नांसाठी मंत्रालयात यावे लागते. विभागीय अधिकाऱ्यांशी व मंत्र्यांशी संपर्क साधताना निवेदनं तयार करणे, दुरुस्ती करणे, झेरॉक्स काढणे किंवा पत्रव्यवहार करणे यासाठी कोणतीही स्वतंत्र सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे आमदारांचे स्वीय सहाय्यक बाहेरच्या दुकानांवर अवलंबून राहतात, जे वेळखाऊ व सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अडचणीचे ठरते.
त्यामुळे मंत्रालय परिसरात “आमदार कक्ष” उभारून संगणक, प्रिंटर, इंटरनेट कनेक्शन, झेरॉक्स मशीन, बसण्याची व्यवस्था आणि सहाय्यक कर्मचारी अशी सुविधा उपलब्ध करून द्यावी. या सोयींमुळे आमदार व त्यांचे सहाय्यक निवेदनं वेळेवर तयार करून मंत्र्यांशी अधिक कार्यक्षमतेने संपर्क साधू शकतील, असे आमदार तरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्य सचिव राजेश कुमार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.