मुंबई – राज्यातील अनेक भागांवर पडलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण अडथळ्यात येऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अजय भामरे, राज्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, “पूरामुळे अनेक विद्यार्थ्यांचे वह्या, पुस्तके, शैक्षणिक साहित्य आणि कागदपत्रे वाहून गेली आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, ही सरकारची जबाबदारी आहे.”
पाटील यांनी पुढे सांगितले की, “राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे आणि खासगी शिक्षणसंस्था यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे. वह्या, पुस्तके, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य पुरवून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.”
या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांचे शिक्षण अखंडितपणे सुरू राहील, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.