मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उभा राहिलेला तणाव यशस्वीरीत्या सोडवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली. आंदोलनाच्या काळात वैयक्तिक हल्ले आणि टीका सहन करतानाही संयम राखत त्यांनी सातत्याने कायदेशीर सल्लामसलत करून उपाययोजना पुढे नेल्या.
मुख्यमंत्र्यांनी राज्याचे महाधिवक्ता आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या चार बैठका घेतल्या. मागण्यांच्या अनुषंगाने मसुदा तयार करून प्रत्येक निर्णयाचा शासकीय आदेश (GR) आधीच तयार ठेवण्यात आला. त्यानंतरच हे प्रस्ताव चर्चेसाठी उपसमितीकडे पाठवण्यात आले. मसुद्याची मांडणी इतकी स्पष्ट आणि ठोस होती की, जरांगे यांनी तो पहिल्या बैठकीतच मान्य केला.
या संपूर्ण आंदोलनकाळात त्यांना वैयक्तिकरित्या लक्ष्य केले गेले, अपशब्दांचा भडिमार झाला. तरीही त्यांनी संयम दाखवला, कुठेही तोल ढळू दिला नाही. त्याचवेळी आपल्या नियमित कार्यक्रमांनाही त्यांनी खंड पडू दिला नाही.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात गणेशोत्सवाचे मोठे महत्त्व आहे. मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणेच गणपती मंडपांना भेटी दिल्या, मुंबई, पुणे, नागपूरमध्ये दर्शन घेतले. दरवर्षीप्रमाणे वाहिन्यांवरील गणपती आरतीतही सहभागी झाले. या वेळेस असा सहभाग वेगळा संदेश देईल अशी भीती व्यक्त केली जात असली तरी, फडणवीस यांनी नेहमीची परंपरा कायम ठेवत आपला वार्षिक क्रम सुरू ठेवला.
विघ्नहर्त्याची आराधना आणि सातत्याने परिश्रम करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांना यश देऊन गेली. त्यामुळेच राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा मराठा आरक्षण देणारे, ते टिकवून ठेवणारे आणि आज पुन्हा मराठा आंदोलन यशस्वीपणे सोडवणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिमा भक्कम केली आहे.