पाकिस्तान डायरी

सख्खे शेजारी, पक्के शत्रू

X: @therajkaran

इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये जैश अल – अद्र या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला करून खळबळ उडवून दिली. या हल्ल्याचा प्रतिकार म्हणून पाकिस्ताननेही इराणच्या बलुचिस्तानमध्ये हल्ला करून बलुच लिबरेशन आर्मी आणि बलूच लिबरेशन फ्रंट या संघटनांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न केला.

पाकिस्तान आणि इराण यांचे संबंध जिवलग मैत्रीतून कट्टर शत्रुत्वाकडे गेले आहेत. 

भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हापासून 1978 पर्यंत इराण पाकिस्तानच्या अत्यंत जवळ होता. पाकिस्तानने 1965 आणि 1971 मध्ये भारताविरुद्ध छेडलेल्या युद्धात इराणने पाकिस्तानला शस्त्र पुरवठ्यासह आवश्यक ती सर्व मदत केली होती. बांगलादेशाच्या निर्मितीनंतर यापुढे आम्ही पाकिस्तानचे विघटन सहन करणार नाही, अशी घोषणा इराणच्या शहाने केली होती. मात्र, अवघ्या सात वर्षांत हे सगळे चित्र बदलले.

इराणमधील आयातुल्ला खोमेनी यांची शिया राजवट आणि पाकिस्तानमध्ये जनरल झिया उल् हक यांच्या नेतृत्वाखालील सुन्नी राजवट यांच्यात खटके उडू लागले. कधीकाळी अमेरिकेचे खंदे समर्थक असलेले हे दोन शेजारी देश परस्परांना पाण्यात पाहू लागले. इराणने अमेरिकेची साथ सोडली आणि त्याचवेळी पाकिस्तानने अमेरिकेशी घट्ट मैत्री निर्माण केली. अरब राष्ट्रांशी इराणचे कधी जमले नाही, तर पाकिस्तानने अरब राष्ट्रांशी मैत्री आणि व्यापाराचे नवे संबंध निर्माण केले. 

अफगाणिस्तानमधील युद्धविरामानंतर सोव्हिएत फौजा परत गेल्या, तो काळ इराण आणि पाकिस्तानचे संबंध बिघडवणारा अत्युच्च क्षण होता. पाकिस्तानने उभा केलेल्या तालिबानच्या विरोधात इराणने संयुक्त फौजांना मदत केली. यामुळे पाकिस्तान चेकाळला होता.

या दोन्ही देशांमधील सामायिक दुवा म्हणजे बलूच जमातीचे लोक आहेत. इराण आणि पाकिस्तानच्या परस्परांना लागून असलेल्या प्रदेशात सुमारे 90 लाख बलुच राहतात. जवळपास पाच लाख बलुच शेजारील अफगाणिस्तानमध्ये राहतात. तसे पाहिले तर पाकिस्तान काय किंवा इराण काय दोन्ही देशांनी बलुच लोकांवर अन्यायच केला आहे.

pakistani diary

इराण आणि पाकिस्तान दोन्ही देशांतील बलुचिस्तान नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध आहे. या समृद्धीला आजपर्यंत हात घातला गेलेला नाही. इराणमधील चबहार आणि पाकिस्तानातील ग्वादर ही दोन बंदरे व्यापारासाठी उत्तम मानली जातात. हे दोन्ही बंदरे बलुचिस्तानचा भाग आहेत. चबहार बंदर भारत विकसित करत आहे, तर ग्वादर बंदराचा विकास चीन करत आहे. इराण पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील बलुच लोकांनी एकत्र येऊन बृहत बलुचिस्तान नावाचा वेगळा देश निर्माण करावा, अशी मागणी लावून धरली आहे. त्याच्या समर्थनार्थ दोन्ही देशांमध्ये अधून – मधून हल्ले होत असतात.

पाकिस्तानने इराणशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र सततचे सत्तांतर आणि सुन्नी प्रभाव यांमुळे हा प्रयत्न अपुरा ठरला आहे. बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान असताना 1995 मध्ये त्यांनी इराणला मित्र, शेजारी आणि इस्लाममधील भाऊ असे संबोधले होते. इराणकडून वायु विकत घेण्यासही त्यांनी सुरुवात केली होती. कायमस्वरुपी वायुपुरवठा करण्यासंदर्भात इराणशी करार करण्याचा इरादाही त्यांनी जाहीर केला होता. मात्र, भुट्टो  यांची सत्ता गेली. नवाज शरीफ पंतप्रधान झाले आणि त्यानंतर परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तानची सत्ता ताब्यात घेतली आणि इराणशी संबंध पुन्हा बिघडले. 

भुट्टो यांचे पती आसिफ अली झरदारी 2008 ते 13 या काळात पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी पुन्हा एकदा इराणशी संबंध प्रस्थापित केले. मात्र ते संबंध पाकिस्तानच्या सदहेतूने नव्हते, तर केवळ झरदारी शिया आहेत आणि इराणची राजवटदेखील शिया आहे या एकाच समान धाग्यातून ते संबंध निर्माण झाले होते. असे असले तरी पाकिस्तान आणि इराणमध्ये वायु पुरवठ्यासंदर्भातील करार झालाच नाही. तोच करार इराणने पुढे भारताशी केला.

इराण आणि पाकिस्तान हे दोघेही देश दहशतवाद्यांचे समर्थक आहेत. लाल समुद्रात इराण हुती बंडखोरांना समर्थन देतो. पॅलेस्टीन आणि हिजबुला गटांना इस्रायलच्या विरोधात पाठबळ देतो. पाकिस्तान भारतात दहशतवाद वाढवणे आणि इतर कारवायांमध्ये सामील आहे.

हे दोन्ही देश परस्परांवर अवलंबून नाहीत. मात्र, परस्परांचा काटा काढण्याची एकदेखील संधी ते सोडत नाहीत. ताज्या हल्ल्यानंतर त्यांच्यातील संबंध आणखी बिघडतील यात शंका नाही.

Also Read: लाहोरला विषारी हवेचा विळखा

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

ताज्या बातम्या पाकिस्तान डायरी

इम्रान खान, गोपनीय कागद आणि शह – काटशह

X: @therajkaran इम्रान खान पाकिस्तानचे सर्वोत्तम क्रिकेटपटू होते. वेगवान गोलंदाज आणि आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती. नव्या चेंडूबरोबरच ते
पाकिस्तान डायरी

ते परत आले आहेत

X: @therajkaran नवाज शरीफ हे पाकिस्तानच्या राजकारणातील बडे प्रस्थ आहेत. तीन वेळा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी त्यांना मिळाली आणि तिन्ही