महाड – अवकाळी पावसामुळे खेड-दापोली रस्त्याची झालेली दुर्दशा ही पूर्णपणे निष्काळजी ठेकेदार आणि हलगर्जी अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराचे फलित आहे, असा आरोप करत मनसेचे कोकण विभागीय नेते आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे.
खेड-दापोली रस्त्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यात रस्ते, पूल व मोऱ्यांच्या सुधारणा समाविष्ट आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे या रस्त्याचा मोठा भाग वाहून गेला असून खेड व दापोली यांचा आपसी संपर्क पूर्णतः खंडित झाला आहे.
महाडमधील एसएमसी कन्स्ट्रक्शन कंपनी या रस्त्याचे काम करत असून, या कंपनीने याआधी केलेल्या महाड-दापोली रस्त्याच्या निकृष्ट कामाचा प्रत्यय खेड-दापोली मार्गावरही दिसून आला आहे. रस्त्याची दर्जाहीन निर्मिती आणि पावसात वाहून गेलेले संरचनात्मक भाग हे ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचे व गुणवत्ताहीन कामाचे जिवंत उदाहरण असल्याचे खेडेकर यांनी नमूद केले.
या रस्त्याच्या बंद अवस्थेमुळे स्थानिक नागरिकांचे दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले असून, शासकीय यंत्रणेचा अपयश पुन्हा एकदा समोर आले आहे.
“या सगळ्या प्रकाराला एसएमसी कंपनीचा ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जठार हे पूर्णपणे जबाबदार आहेत. यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई करावी,” अशी मागणी वैभव खेडेकर यांनी केली.
मनसेच्या वतीने यासंदर्भात लवकरच संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाची चेतावणी दिली जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.