नांदेड: तेलंगणा व कर्नाटकात भाजपची सत्ता नसतानाही या दोन्ही राज्यांनी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंतचे रस्ते चकचकीत, सुसज्ज आणि प्रवासयोग्य केले आहेत. याउलट महाराष्ट्रातील सीमाभागातील रस्ते मात्र आजही खड्ड्यांनी भरलेले, धोकादायक आणि कायम दुर्लक्षित आहेत.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर ते हाणेगाव (32 कि.मी.) हा प्रवास पार करण्यासाठी तब्बल दीड तास लागतो. यावरून या भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था स्पष्ट होते. कर्नाटकाच्या औराद परिसरात प्रवेश करताच, महाराष्ट्रातील उखडलेल्या रस्त्यांमधून एकदम गुळगुळीत फोरलेन मार्गावर येताना फरक प्रकर्षाने जाणवतो.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत महाराष्ट्राच्या हद्दीतील हाणेगाव ते औराद (कर्नाटक) या केवळ ४ कि.मी. अंतराचा रस्तासुद्धा व्यवस्थित बांधता आलेला नाही, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्रात राहणारे परंतु व्यवहार कर्नाटकमध्ये करणारे नागरिक आता संतप्त झाले आहेत.
तेलंगणा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांनी आपल्या हद्दीपासून सुरू होणारे रस्ते दर्जेदार बनवले असून, हे राज्यांचे नियोजन आणि लोकप्रतिनिधींची जागरूकता दर्शवते. याउलट, महाराष्ट्रातील स्थानिक नेतृत्व आणि सरकारची उदासीनता स्पष्ट होते.
बिलोलीमार्गे तेलंगणात जाणाऱ्यांना तर महाराष्ट्रातील रस्त्यांवरचा प्रवास जीवघेणा वाटतो. देगलूरहून हाणेगावमार्गे औरादपर्यंतचा ३२ कि.मी.चा प्रवास पूर्ण करायला दीड तास लागतो. स्थानिक नेतृत्वाचे दुर्लक्ष आणि सत्ताधाऱ्यांचा गोंधळ यामुळे हे प्रश्न आजतागायत सुटलेले नाहीत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते सोमवार, २६ मे रोजी नांदेडमध्ये उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने, महाराष्ट्रातील जनतेने सीमाभागातील रस्त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, जिथे भाजप सत्तेत नाही त्या कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांनीही सीमाभागातील रस्त्यांमध्ये झपाट्याने प्रगती साधली आहे. त्यामुळे भाजपशासित महाराष्ट्रात हा मूलभूत प्रश्न सुटत नसेल, तर तो निश्चितच लाजिरवाणा ठरतो.