मुंबई – “सनातन विचारधारेच्या आधारे राष्ट्राचे पुनरुत्थान हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य आहे. हिंदू समाज हाच राष्ट्रीय समाज आहे. तो टिकला, तरच राष्ट्र टिकेल,” असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री पराग कंगले यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांत आयोजित ‘संघ शिक्षा वर्गा’चा प्रकट समारोप शनिवार, दिनांक २४ मे रोजी संध्याकाळी ६.१५ वाजता आयईएस राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी, दादर (पूर्व) येथे उत्साहात पार पडला.
या वेळी शिक्षार्थींनी वर्गात घेतलेल्या प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक सादर केले. यामध्ये दंडयुद्ध, नियुद्ध, खेळ, घोषवादन आणि समतेचे सादरीकरण करण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध गीतकार व कवी मनोज शुक्ला ‘मुंतशिर’ उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी संघाशी असलेल्या आपल्या बालपणीच्या संबंधांचा उल्लेख करताना म्हटले, “राष्ट्रीय कार्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आलेले लोक पाहून मला अपार आनंद होत आहे. सरस्वती विद्या मंदिरात शिकत असताना मी संघाच्या विचारसरणीशी जोडलो गेलो. ‘तेरी मिट्टी मे मिल जावां’ हे गाणं लिहिता आलं, याचं श्रेय मी संघ संस्कारांना देतो.”
पराग कंगले पुढे म्हणाले, “संघाला विरोध करणाऱ्यांबद्दलही संघाने कधीही द्वेष बाळगला नाही. उलट, त्यांच्याशी संवाद साधून मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. संघ हे व्यक्तिनिर्मिती करणारे कार्य आहे. हिंदू अस्मितेची जाणीव व अभिमान असलेली, राष्ट्रनिष्ठ व देशभक्त व्यक्तिमत्त्वे घडविण्याचे कार्य संघ सातत्याने करत आहे.”
“सेवा, सामाजिक सद्भाव आणि समरसता – या तीन आयामांच्या आधारे स्वयंसेवकांनी समाजात जाऊन कार्य करायचे आहे. समाजातील एकात्म शक्ती मजबूत करणे, हेच आमचे ध्येय आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक वर्ग कार्यवाह दीपक शाह यांनी केले. ९ मेपासून सुरू झालेल्या या वर्गामध्ये १८ ते ४२ वयोगटातील एकूण ४२ शिक्षार्थींनी सहभाग घेतला होता.