मुंबई : मुंबईतील सर्वात जुने, व्यापारीदृष्ट्या आणि मत्स्य व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे ससून डॉक बंदर आता आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करणार आहे. बुधवारी मंत्रालयात फिनलंडमधील कंपन्यांच्या शिष्टमंडळाने केलेल्या भेटीत या संदर्भातील आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या संधींवर सविस्तर चर्चा झाली, अशी घोषणा मत्स्य व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.
राणे यांनी सांगितले की, सध्या ससून डॉकवर मासेमारी बोटी त्यांच्या मूळ क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात कार्यरत आहेत. त्यामुळे अस्वच्छता, दुर्गंधी आणि मासळी स्वच्छता व सुरक्षिततेच्या निकषात घट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर डॉकच्या आधुनिकीकरणासाठी एक मॉड्युलर योजना तयार करण्यात येत आहे. यात विद्यमान ऑपरेशनल अडचणी आणि पर्यावरणीय परिस्थितींचा विचार करून आधुनिक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यामुळे ससून डॉक हे जागतिक दर्जाचे, सुस्वच्छ, कार्यक्षम आणि टिकावू बंदर म्हणून विकसित करण्याचा उद्देश असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
फिनलंडमधील कंपन्यांच्या शिष्टमंडळाने राणे यांची मंत्रालयात भेट घेऊन आधुनिक मासेमारी तंत्रज्ञान, डिजिटल सोल्युशन्स आणि पर्यावरणपूरक नवकल्पना यांवर चर्चा केली. या तंत्रज्ञानामुळे बंदराची कार्यक्षमता वाढेल आणि मच्छीमारांचे उत्पन्नही अधिक होईल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.
या चर्चेस पशुसंवर्धन व दुग्धविकास तसेच मत्स्य विकास विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे उपस्थित होते.