कोल्हापूर : प्रतिनिधी – शिरोली पुलाची येथील श्री दत्त फाउंड्रीला शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. आगीत संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले असून आर्थिक नुकसान झाले आहे. घटनास्थळी कामगारांनी आग विझवण्यासाठी गर्दी केली होती. अखेर दीड तासाच्या परिश्रमानंतर तीन अग्निशमन बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिरोली औद्योगिक वसाहतीत श्री दत्त फाउंड्री रोहित बोडके यांच्या मालकीची आहे. आज सायंकाळी पाचच्या सुमारास मुख्य कार्यालयातून धुराचे लोट येताना दिसले. याची माहिती कारखान्याच्या मालकांना दिली.. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने कार्यालय जळून खाक झाले. त्यानंतर तीन अग्निशामक दलाच्या गाड्या यांच्या साह्याने आग आटोक्यात आणली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या आगीत संगणक, लॅपटॉप, मशीन्स व इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घटनास्थळी कामगारांनी अधिक गर्दी केली. सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. कारखान्याच्या अंतर्गत विद्युत जोडणीत शॉर्टसर्किटने आग लागल्याची शक्यता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.